नवी दिल्ली : ३१ जुलैच्या अंतिम मुदतीपर्यंत ७.२८ कोटींहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्रांचा भरणा झाला असून हा एक नवा विक्रम असल्याचे आयकर विभागाने शुक्रवारी सांगितले. २०२४-२५ च्या मूल्यांकन वर्षासाठी भरलेले आयकर रिटर्न (आयटीआर) गेल्या वर्षी दाखल केलेल्या ६.७७ कोटींच्या तुलनेत अधिक आहे, असेही त्यात म्हटले आहे.
ॲसेसमेंट इयर २०२४-२५ साठी दाखल केलेल्या एकूण ७.२८ कोटी आयटीआरपैकी जुन्या कर प्रणालीमध्ये दाखल केलेल्या २.०१कोटी आयटीआरच्या तुलनेत ५.२७ कोटी नवीन कर प्रणालीमध्ये दाखल करण्यात आले आहेत, असे कर विभागाने एका निवेदनात म्हटले आहे.
पगारदार करदात्यांची आणि इतर नॉन-टॅक्स ऑडिट प्रकरणांची आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२४ होती आणि त्या एकाच दिवशी सर्वाधिक ६९.९२ लाखांहून अधिक आयटीआर दाखल केले गेले. या विभागाला आयटीआर प्रथमच दाखल करणाऱ्यांकडून तब्बल ५८.५७ लाख आयटीआर देखील प्राप्त झाले. त्यामुळे करजाळे अधिक विस्तारत असल्याचे सकारात्मक संकेत मिळत आहेत.
आयटीआर (आयटीआर 1, आयटीआर -2, आयटीआर -4, आयटीआर -6) आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ एप्रिल २०२४ रोजी ई-फायलिंग पोर्टलवर तैनात करुन ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. ॲसेसमेंट इयर २०२४-२५साठी दाखल केलेल्या ७.२८ कोटी आयटीआरपैकी ४५.७७ टक्के आयटीआर-1 (३.३४ कोटी), १४.९३ टक्के आयटीआर-2 (१.०९ कोटी), आयटीआर -3 हे १२.५ टक्के (९१.१० लाख), आयटीआर-4 हे २५.७७ टक्के ( १.८८ कोटी) आणि आयटीआर -5 ते आयटीआर-7 हे १.०३ टक्के (७.४८ लाख) आहेत. त्यापैकी ४३.८२ टक्क्यांहून अधिक आयटीआर ई-फायलिंग पोर्टलवर उपलब्ध असलेल्या ऑनलाइन आयटीआर युटिलिटीचा वापर करून दाखल केले गेले आहेत आणि उर्वरित ऑफलाइन आयटीआर युटिलिटी वापरून दाखल करण्यात आले आहेत, असे त्यात म्हटले आहे.
‘पीक’ फाइलिंग कालावधी दरम्यान, ई-फायलिंग पोर्टलने यशस्वीरित्या प्रचंड आयटीआर दाखल करुन घेतले आणि आयटीआर भरण्यासाठी करदात्यांना उत्तम अनुभव आला. आयटीआर भरण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजे केवळ ३१ जुलै २०२४ रोजी यशस्वी लॉगिनचे प्रमाण तब्बल ३.२ कोटी होते. आयटीआरची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आणि परतावा जारी करण्यासाठी ई-पडताळणीची प्रक्रिया महत्त्वाची आहे, असे त्यात म्हटले आहे.
विशेष महत्त्वाचे म्हणजे ६.२१ कोटींपेक्षा जास्त आयटीआर ई-सत्यापित झाले आहेत. त्यापैकी ५.८१ कोटींपेक्षा जास्त आधार-आधारित ओटीपीद्वारे (९३.५६ टक्के) आहेत. ई-सत्यापित आटीआरपैकी ॲसेसमेंट इयरसाठी २.६९ कोटींपेक्षा जास्त आयटीआर २०२४-२५ची प्रक्रिया ३१ जुलै २०२४ पर्यंत (४३.३४ टक्के) झाली आहे. तर जुलै २०२४ (एवाय २०२४-२५ साठी) महिन्यात टीआयएन २.० पेमेंट प्रणालीद्वारे ९१.९४ लाखांहून अधिक चलने प्राप्त झाली आहेत, तर १ एप्रिल २०२४ पासून टीआयएन २.०द्वारे दाखल केलेल्या एकूण चलनाची संख्या १.६४ कोटी (एवााय २०२४-२५ साठी) आहेत.
ई-फायलिंग हेल्पडेस्क टीमने ३१ जुलैपर्यंत वर्षभरात करदात्यांच्या अंदाजे १०.६४ लाख प्रश्नांची हाताळणी केली असून सर्वाधिक फायलिंग कालावधीत करदात्यांना सक्रियपणे मदत केली आहे.
मुदतीत भरला नसल्यास त्वरित दाखल करण्याचे आवाहन
आयटीआर आणि फॉर्म भरताना त्यांच्या समर्थनासाठी कर व्यावसायिक आणि करदात्यांची कृतज्ञता व्यक्त करताना निवेदनात म्हटले आहे की, आयटीआर दाखल केल्याच्या ३० दिवसांच्या आत, करदात्यांना त्यांच्या असत्यापित आयटीआरची पडताळणी करण्याची विनंती केली जाते. कोणत्याही कारणास्तव ज्या करदात्यांनी त्यांचा आयटीआर मुदतीच्या आत भरणे चुकवले, त्यांनी त्वरित फाइलिंग पूर्ण करण्याचे आवाहनही विभागाने केले आहे. निवेदनात म्हटले आहे की करदात्यांना जुन्या आणि नवीन कर प्रणालींबद्दल शिक्षित करण्यासाठी खूप भर देण्यात आला आहे. एफएक्यू आणि शैक्षणिक व्हिडीओज डिझाईन करून ई-फायलिंग पोर्टलवर अपलोड करण्यात आले होते, असे त्यात म्हटले आहे. करदात्यांना त्यांचे आयटीआर लवकर दाखल करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सोशल मीडियावर केंद्रित प्रचार मोहिमा राबवण्यात आल्या.