पाम तेलाची आयात १३ वर्षांच्या नीचांकावर; स्वस्त सोयाबीन तेल खरेदीवर भर

जानेवारी २०२५ मध्ये भारतातील पाम तेलाची आयात वार्षिक ६५ टक्क्यांनी घसरून २,७५,२४१ टन झाल्याने हा १३ वर्षांतील नीचांक आहे, कारण खरेदीदारांनी स्वस्तातील सोयाबीन तेल खरेदी वाढवली आहे, असे सॉलव्हंट एक्स्ट्रॅक्ट असोसिएशन ऑफ इंडिया (एसईए)ने जाहीर केले.
पाम तेलाची आयात १३ वर्षांच्या नीचांकावर; स्वस्त सोयाबीन तेल खरेदीवर भर
Published on

नवी दिल्ली : जानेवारी २०२५ मध्ये भारतातील पाम तेलाची आयात वार्षिक ६५ टक्क्यांनी घसरून २,७५,२४१ टन झाल्याने हा १३ वर्षांतील नीचांक आहे, कारण खरेदीदारांनी स्वस्तातील सोयाबीन तेल खरेदी वाढवली आहे, असे सॉलव्हंट एक्स्ट्रॅक्ट असोसिएशन ऑफ इंडिया (एसईए)ने जाहीर केले. जानेवारीमध्ये एकूण वनस्पती तेलाची आयात १३ टक्क्यांनी घसरून १०.४९ लाख टन झाली आहे, जी एका वर्षाच्या आधी १२ लाख टन होती. पाम तेलाचा भारतातील बाजारपेठेतील हिस्सा कमी होत आहे आणि सोया तेलाचा वाटा वाढत आहे, असे ‘एसईए’ने एका निवेदनात म्हटले आहे.

मलेशियन पाम तेलाच्या आयातीत घट झाली कारण निर्यात पुरवठा नियम कडक केल्याने ग्राहकांना कमी किमतीच्या दक्षिण अमेरिकन सोयाबीन तेलाकडे वळण्यास प्रवृत्त केले. जानेवारीमध्ये सोयाबीन तेलाची आयात दुपटीने वाढून ४,४४,०२६ टन झाली आहे जी एका वर्षापूर्वी १,८८,८५९ टन होती, तर सूर्यफूल तेलाची आयात ३१ टक्क्यांनी वाढून २,८८,२८४ टन झाली.

पाम तेल उत्पादनांमध्ये, रिफाइंड ब्लीच्ड डिओडोराइज्ड (RBD) पामोलिनची आयात एका वर्षापूर्वी २,४४,६७८ टनांवरून ३०,४६५ टनांवर घसरली आहे. कच्च्या पाम तेलाची निर्यात ५,३२,८७७ टनांवरून घसरून २,४०,२७६ टनांवर आली. नेपाळमधून कमी किमतीत रिफाइंड सोयाबीन तेल आणि पाम तेलाची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने स्थानिक बाजारपेठ विस्कळीत करत असल्याचे एसईएने म्हटले आहे. नेपाळने ऑक्टोबर २०२४ च्या मध्यापासून ते जानेवारी २०२५ च्या मध्यापर्यंत भारताला १,१०,००० टन खाद्यतेलाची निर्यात केली.

भारत जगातील सर्वात मोठा खाद्यतेल ग्राहक

गेल्या महिन्यात पाम तेलाच्या किमती ८०-१०० अमेरिकन डॉलरने कमी झाल्या असल्या तरी सोयाबीन तेल अधिक आकर्षक आहे, असे एसईएने म्हटले आहे. जगातील सर्वात मोठा खाद्यतेल ग्राहक आणि आयातदार असलेल्या भारताकडे १ फेब्रुवारीपर्यंत २१.७६ लाख टन खाद्यतेलाचा साठा होता.

logo
marathi.freepressjournal.in