
लासलगाव/ वार्ताहर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कृषी उत्पादनावर तब्बल अमेरिकेत आयात शुल्कात २६ टक्के वाढ केल्याच्या निर्णयाचा जगभरात प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयाचा महाराष्ट्रात विशेषतः नाशिक जिल्ह्याततील कांदा द्राक्ष बेदाणे आणि आंबा उत्पादकांना मोठा फटका बसणार असल्याने घबराट निर्माण होऊन कांदा, द्राक्ष आंबा निर्यात संभ्रम निर्माण झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने कांदा आणि द्राक्षाचे मोठे उत्पादन व निर्यात होत असते तसेच बेदाणा व महाराष्ट्रातील कोकण भागातील हापूस आंबा येथे कृषक विकिरण केंद्रात विकिरण होऊन लासलगाव मार्गे अमेरिकेला रवाना होतो त्यामुळे २६ टक्के आयत शुल्काचा खर्च विविध पिकांच्या भावावर काय परिणाम करतो याची चिंता प्रामुख्याने निर्यात क्षेत्राला लागली आहे.
केंद्र शासनाकडन अमेरिकेला रवाना होणाऱ्या कांद्याबाबत देखील आता हीच पद्धती वापरली जाणार असल्याने २० टक्के कांद्याचे निर्यात शुल्क हटविल्यानंतर तब्बल एक आठवडा होऊन ही कांदा बाजार भावात वाढ होण्याऐवजी घसरण होतांना अथवा जैसे थे परिस्थिती दिसत आहेत. कांदा, द्राक्ष, बेदाणा आणि आंबा निर्यात होताना अमेरिकेतील आयात शुल्क काय ठरते याबाबत संभ्रम आहे मात्र २६ टक्के वाढ होणारच असे गृहीत धरून आता मिळणाऱ्या भावावर परिणाम होतो की भाव चांगलेच राहतात हे लवकरच समजेल.
अमेरिकेने भारतावर लादलेले निर्बंध
भारत अमेरिकेतून आयात होणाऱ्या कृषी उत्पादनांवर सरासरी ३७.७ टक्के आयात शुल्क आकारतो, तर अमेरिका भारतातून येणाऱ्या उत्पादनांवर आधी फक्त ५.३ टक्के शुल्क आकारत होती. आता ट्रम्प यांनी हे शुल्क २६ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे, आणि ९ एप्रिल २०२५ पासून सर्व आयातीवर अतिरिक्त १० टक्के शुल्क लागू होणार आहे, भारतीय कृषी उत्पादनांवर १०० टक्क्यांपर्यंत शुल्क लादण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे
अमेरिकन टॅरिफचा महाराष्ट्रातील निर्यातदारांना मोठा फटका
नव्या टॅरिफमुळे उत्पादनांच्या किमती वाढतील, ज्यामुळे अमेरिकन बाजारात भारतीय शेतीमालाची स्पर्धात्मकता कमी होऊ शकते. याचा थेट फटका महाराष्ट्र राज्यांला बसू शकतो, जिथे द्राक्ष, डाळिंब, संत्री, कांदा , आंबा, बेदाणा आणि कापूस यांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते.भारतानेही अमेरिकन कृषी उत्पादनांवर (उदा. बदाम, सफरचंद, सोयाबीन) उच्च शुल्क कायम ठेवले आहे. ट्रम्प यांच्या नव्या धोरणाला प्रत्युत्तर म्हणून भारत हे शुल्क आणखी वाढवू शकतो,
शेतकऱ्यांवरील संभाव्य परिणाम हा आर्थिक संकट येऊ शकते. निर्यातीत घट झाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होईल, विशेषतः निर्यातक्षम पिकांवर जे अवलंबून आहेत. अमेरिकेतून आयात होणारी उत्पादने महागल्यास भारतात काही वस्तूंच्या किमती वाढू शकतात असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.