मुंबई : अलीकडच्या काळात गुंतवणूकीचं महत्त्व लोकांच्या लक्षात यायला लागलं आहे. त्यामुळं लोक पैसे कमावण्यासोबतच ते योग्य ठिकाणी कसे गुंतवता येतील, यासाठी प्रयत्न करत असतात. सध्या गुंतवणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. लोकांची गुंतवणूक करण्याची इच्छाही असते, मात्र आपण आपण केलेली गुंतवणूक सुरक्षित राहील की नाही, या भीतीमुळं ते गुंतवणूक करणं टाळतात. तुम्हीही जर असाच विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसच्या विविध स्कीम्समध्ये गुंतवणूक करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. पोस्ट ऑफिसच्या या स्कीम्समध्ये तुमचे पैसे सुरक्षित तर राहतीलच, परंतु त्यांच्यावर चांगलं व्याजही मिळेल. चला जाणून घेऊया असाच काही स्कीम्सबद्दल...
1.किसान विकास पत्र (KVP)-
या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला वार्षिक ७.५% व्याज मिळेल. परंतु तुम्ही जर ही रक्कम ९ वर्षे आणि ७ महिन्यांसाठी जमा केल्यास ती रक्कम थेट दुप्पट होईल. या स्कीममध्ये गुंतवणुकीच्या काही अटी आहेत. जसं की, या योजनेत १००० रुपयांपेक्षा कमी रक्कम जमा करता येणार नाही. तथापि, कमाल रकमेवर कोणतीही निश्चित मर्यादा नाही. तसेच मॅच्युरिटीपूर्वीही तुम्ही ती थांबवू शकता.
2.नॅशनल सेव्हिंग टाईम डिपॉझिट अकाउंट-
या योजनेअंतर्गत एक वर्ष (६.९%), दोन वर्षे (७%), तीन वर्षे (७.१%) आणि पाच वर्षांसाठी (७.५%) पैसे गुंतवले जाऊ शकतात. यामध्येही किमान मर्यादा १००० रुपये आहे, कमाल मर्यादा नाही. तसेच मुदत संपल्यानंतर जमा केलेली रक्कम पुन्हा जमा करावी लागणार आहे. ही गुंतवणूक ६ महिन्यांपूर्वी खंडीत केली जाऊ शकत नाही, आणि जर तुम्ही या योजनेतून एक वर्षापूर्वी पैसे काढले तर तुम्हाला बचत खात्यावर जेवढं व्याज मिळतं तेवढंच व्याज मिळेल.
3.सिनियर सिटीजन सेव्हिंग (SCSS)-
ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, या स्कीममध्ये वार्षिक ८.२% व्याज आहे. मात्र हे व्याज पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मिळणार आहे. हे खाते एक वर्षापूर्वी बंद केल्यास व्याज दिले जाणार नाही. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, वय किमान ६० वर्षे असावं, तसेच तुम्ही या योजनेत किमान १००० रुपये आणि कमाल ३० लाख रुपये जमा करू शकता.
4.राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र-
या योजनेत, पैसे पाच वर्षांत मॅच्युअर होतात, ज्यामध्ये वार्षिक ७.७% व्याज मिळेल, परंतु हे व्याज केवळ मॅच्युरिटीवेळी उपलब्ध असेल. यामध्ये तुम्ही १००० रुपयांपासून गुंतवणूक करू शकता परंतु कमाल रकमेवर मर्यादा नाही.
5.सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)-
१८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही भारतीय व्यक्ती यामध्ये गुंतवणूक करू शकते. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना पालकांसोबत खातं उघडावे लागेल. यामध्ये व्याज दर ७.१% (वार्षिक चक्रवाढ) आहे आणि १५ वर्षांत परिपक्व होईल.
यामध्ये तुम्ही एका आर्थिक वर्षात किमान ५०० रुपये आणि कमाल १.५० लाख रुपये जमा करू शकता. या खात्यातून एका वर्षाच्या कालावधीनंतर कर्जही घेता येते.