
नवी दिल्ली : निवृत्ती निधी संस्था ईपीएफओच्या सदस्यांना लवकरच बँकिंग प्रणालीच्या बरोबरीने सेवा मिळण्याची आणि एटीएमद्वारे दावा रकमेची रक्कम काढण्याची सुविधा मिळू शकते, असे विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले. नव्या प्रणालीअंतर्गत लाभार्थी किंवा विमाधारक एटीएमद्वारे त्यांचा रकमेसाठी दावा करू शकतील.
केंद्रीय कामगार सचिव सुमिता दावरा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेमध्ये (ईपीएफओ) तंत्रज्ञानविषयक पायाभूत सुविधांच्या सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे.
गेल्या काही महिन्यांत सुधारणा दिसून येत असल्या तरी जानेवारी २०२५ मध्ये हार्डवेअर अद्ययावततेच्या परिणामी आणखी सुधारणा दिसतील, असे दावरा यांनी सांगितले.
याबाबतची प्रक्रिया सुलभ आणि कार्यक्षम करण्यासाठी प्रणालीगत सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही कामगार सचिवांनी नमूद केले.
आधुनिकीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून ईपीएफओ प्रणालींची तुलना भारतातील अधिक उत्तमप्रकारे कार्यरत असलेल्या बँकिंग प्रणालींसोबत करण्याचे लक्ष्य ठेवले असून सुविधा सुलभतेकरिता अधिक पारदर्शकता आणि दाव्यांचे सुलभ व्यवस्थापन याला प्राधान्य देत असल्याचेही दावरा म्हणाल्या.
ईपीएफओ चालविलेल्या कर्मचारी जमा संलग्न विमा (ईडीएलआय) योजनेंतर्गत दिवंगत सदस्यांच्या वारसांना अधिकाधिक ७ लाखांची रक्कम दिली जाते. नव्या प्रणालीत दिवंगत ईपीएफओ सदस्यांच्या वारसालाही दावा निकाली निघाल्यानंतर एटीएमद्वारे पैसे काढता येतील.
ईपीएफओकडून हार्डवेअर अद्ययावत पूर्ण झाल्यानंतर नवी प्रणाली सुरू होण्याची शक्यता असून ईपीएफओ सदस्यांना एटीएमद्वारे दावा रक्कम काढण्यासाठी वापरण्यासाठी समर्पित कार्डदेखील दिली जाण्याची शक्यता आहे.
ईपीएफओकडे सध्या ७ कोटी योगदान करणारे सदस्य आहेत. निवृत्ती निधी संस्थेच्या भविष्य निर्वाह निधी, निवृत्तनिधी आणि गट विमा योजनांअंतर्गत ते समाविष्ट आहेत.