रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आणि नवल टाटा यांच्या दुसऱ्या पत्नीचे चिरंजीव नोएल टाटा यांचे नाव टाटा समूहाचे वारसदार म्हणून आघाडीवर होते.
रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन
Published on

मुंबई : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या चेअरमनपदी नोएल टाटा यांची निवड करण्यात आली आहे. रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आणि नवल टाटा यांच्या दुसऱ्या पत्नीचे चिरंजीव नोएल टाटा यांचे नाव टाटा समूहाचे वारसदार म्हणून आघाडीवर होते. नोएल हे सध्या ट्रेंट लिमिटेड आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष, टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक, टाटा स्टील आणि टायटन कंपनीचे उपाध्यक्ष आहेत.

दिवंगत रतन टाटा यांच्या उत्तराधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठी टाटा ट्रस्टने शुक्रवारी सकाळी एक बैठक बोलावली होती. या बैठकीत नोएल टाटा यांच्याकडे टाटा ट्रस्टची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. नोएल टाटा हे आधीपासून सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टमध्ये विश्वस्त आहेत. त्यांच्याकडे टाटा सन्सचा ६६ टक्के हिस्सा आहे.

नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. नोएल ४० वर्षांहून अधिक काळ टाटा समूहाशी संबंधित आहेत. सध्या ते टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांच्या संचालकपदावर आहेत. ते टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, व्होल्टास आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि टाटा स्टील आणि टायटन कंपनी लिमिटेडचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी ११ वर्षाहून अधिक काळ ट्रेंटचे एमडी म्हणून काम केले. आज या कंपनीचे बाजारमूल्य तब्बल २.८ लाख कोटी रुपये आहे. ऑगस्ट २०१० ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत ते टाटा इंटरनॅशनल लिमिटेडशी एमडी होते. या कालावधीत, कंपनीची उलाढाल ५०० दशलक्ष डॉलरवरून ३ अब्ज डॉलर झाली.

नोएल हे ससेक्स विद्यापीठाचे पदवीधर आहेत आणि त्यांनी INSEAD मधील आंतरराष्ट्रीय कार्यकारी कार्यक्रम पूर्ण केला आहे. नोएल टाटा यांचा मुलगा नेव्हिल टाटा २०१६ मध्ये ट्रॅटमध्ये रुजू झाला आणि अलीकडेच स्टार बाजारचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.

logo
marathi.freepressjournal.in