RBI कडून शुक्रवारी व्याजदरात अर्धा टक्का कपात शक्य; एसबीआय रिसर्चचा दावा

पतपुरवठावाढीसाठी आणि आर्थिक अनिश्चिततेला पायबंद घालून अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी आरबीआयकडून मोठी व्याजदर कपात केली जाण्याची शक्यता
RBI कडून शुक्रवारी व्याजदरात अर्धा टक्का कपात शक्य; एसबीआय रिसर्चचा दावा
Published on

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) शुक्रवारी ५० आधार अंकांची मोठी कपात करू शकते, असे एसबीआय रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे. पतपुरवठावाढीसाठी आणि आर्थिक अनिश्चिततेला पायबंद घालून अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी आरबीआयकडून मोठी व्याजदर कपात केली जाण्याची शक्यता या अहवालात व्यक्त केली आहे. तथापि, काही तज्ज्ञांनी शुक्रवारी जाहीर होणारी व्याजदर कपात ही पाव टक्के केली जाऊ शकते, असेही म्हटले आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक पाव टक्के की अर्धा टक्का व्याजदर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरबीआयच्या पतधोरण समिती (एमपीसी)ची येत्या ४ जून रोजी पुढील द्वैमासिक चलनविषयक धोरणावर चर्चा सुरू करेल आणि ६ जून (शुक्रवार) रोजी निर्णय जाहीर करेल. रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये प्रमुख व्याजदर (रेपो) प्रत्येकी २५ आधार अंकांची कपात केल्याने तो ६ टक्क्यांवर आला. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय एमपीसीने एप्रिलच्या धोरणात तटस्थतेवरून अनुकूलतेचा दृष्टिकोन बदलण्याचा निर्णय घेतला. आम्हाला २०२५ जूनच्या धोरणात ५० आधार अंकांनी व्याजदर कपात अपेक्षित आहे कारण मोठी व्याजदर कपात अनिश्चिततेला वातावरणाला संतुलित करू शकते, असे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक संशोधन विभागाच्या ‘प्रिल्युड टू एमपीसी मीटिंग- जून ४-६, २०२५’ या संशोधन अहवालात म्हटले आहे.

त्यात पुढे म्हटले आहे की मोठ्या प्रमाणात व्याजदर कपात केल्याने पतवितरणाला पुन्हा चालना मिळू शकते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांतील एकत्रित व्याजदर कपात १०० आधार अंकांनी होऊ शकते, असे त्यात म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in