

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने सोमवारी सांगितले की, तीन टप्प्यांत ६० हजार कोटी रुपयांच्या सरकारी रोख्यांची खरेदी करणार असून बँकिंग प्रणालीमध्ये निधी गुंतवणूक करण्यासाठी इतर अनेक पावले उचलण्याची घोषणा केली.
रोकड स्थिती व्यवस्थापित करण्यासाठी उपायांचा एक भाग म्हणून रिझर्व्ह बँकेने ३१ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी अमेरिकन डॉलर/रुपये/ खरेदी/विक्री ‘स्वॅप’ लिलावाची घोषणा केली. निधी गुंतवण्यासाठी आरबीआयने सांगितले की, ओपन मार्केट ऑपरेशन्स (ओएमओ) ३० जानेवारी, १३ फेब्रुवारी आणि २० फेब्रुवारी रोजी प्रत्येकी २० हजार कोटी रुपयांच्या तीन टप्प्यांमध्ये ६० हजार कोटी रुपयांच्या एकूण रकमेसाठी भारत सरकारच्या रोख्यांच्या खरेदीचा लिलाव होणार आहे.
याशिवाय, ५६ हजार कोटी रुपयांच्या अधिसूचित रकमेसाठी ५६-दिवसीय व्हेरिएबल रेट रेपो (व्हीआरआर) लिलाव ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
रिझव्र्ह बँक विकसित होणारी तरलता आणि बाजार परिस्थितीचे निरीक्षण करणे सुरू ठेवेल आणि व्यवस्थित तरलतेची परिस्थिती सुनिश्चित करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करेल, असे आरबीआयने म्हटले आहे. प्रत्येक ऑपरेशनसाठी तपशीलवार सूचना स्वतंत्रपणे जारी केल्या जातील, असेही त्यात म्हटले आहे.