
नवी दिल्ली : आरबीआयने रेपो दरात कपात केल्यानंतर देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जावरील व्याजदरात ०.५० टक्के कपात केली. यामुळे गृह कर्जासहित सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होणार आहेत. नवीन व्याजाचे दर १५ जूनपासून लागू होणार आहेत.
आरबीआयने रेपो दर घटवल्यावर त्याचा थेट परिणाम कर्जाच्या व्याजदरावर पडतो. त्यामुळे गृह, वैयक्तिक, कार कर्ज स्वस्त होते. त्यामुळे आपला ईएमआय कमी होतो. एसबीआयने ईबीएलआर, एमसीएलआर आणि गृह कर्जावरील व्याजात कपात केली.
एसबीआयने गृह कर्जावरील व्याजदर हे ‘सिबील’ स्कोअरवर आधारित केले आहेत. त्यानुसार ७.५० ते ८.४५ टक्के व्याजदर ठेवले आहे, तर एसबीआय गृहकर्ज मॅक्सगेन ओडीवरील व्याजदर ७.७५ ते ८.७० टक्के असेल. टॉपअप गृहकर्जासाठी व्याजदर ८ ते १०.५० टक्के असेल.
एसबीआयचे गृहकर्ज ईबीएलआरला (एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट) संलग्न असतात. सध्या ईबीएलआर ८.१५ टक्के आहे. ‘सिबील’ स्कोअर, कर्जाचा कालावधी, अन्य कारणांवर व्याजदर वेगळा असतो.
ईबीआरमध्ये बदल
एसबीआयने आपला एक्सटर्नल बेंचमार्क लेडिंग रेट ८.६५ टक्क्यांवरून ८.१५ टक्के केला आहे. या व्याजदरावर बँक आपले गृहकर्ज व एमएसएमईच्या कर्जाचा व्याजदर ठरवते.
एमसीएलआर कायम
एसबीआयने आपला एमसीएलआर (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट) मध्ये कोणताही बदल केला नाही. एक महिन्यासाठी एमसीएलआर दर ८.२० टक्के, तीन महिन्यांसाठी ८.५५ टक्के, सहा महिन्यांचा ८.९० टक्के, तर एक वर्षाचा ९ टक्के, दोन व तीन वर्षांचा ९.०५ व ९.१० टक्के आहे.