![सेबी अध्यक्षांची चिनी कंपन्यांमध्ये गुंतवणूक, माधबी पुरी-बुच यांच्यावर काँग्रेसच्या आरोप फैरी कायम](http://media.assettype.com/freepressjournal-marathi%2F2024-03%2F5d57e46f-60df-405b-9f49-46729c07b335%2FMadhabi_Puri_Buch.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नवी दिल्ली: शेअर बाजार झाल्याचेही नियामक सेबीच्या प्रमुखांवर काँग्रेसने नव्याने आरोप केले. माधबी पुरी-बुच यांनी चिनी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. विशेष म्हणजे जेव्हा भारताचे शेजारच्या चीनबरोबरचे राजनैतिक संबंध बिघडले होते, तेव्हाच ही गुंतवणूक झाल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी बुच यांच्या विरोधात नवे आरोप करताना, बुच यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतच शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या चिनी कंपन्यांमध्ये ३६.९ कोटी रुपयांचे व्यवहार केले, असे म्हटले आहे.
काँग्रेसच्या यापूर्वीच्या आरोपावर बुच यांनी शुक्रवारीच स्पष्टीकरण दिले होते. बुच यांचे पती धवल बुच यांच्या महिंद्रा समूहातील गुंतवणुकीवरून विरोधी पक्षाने रान उठविले होते. मात्र समूहाने हे आरोप फेटाळून लावले होते. माधवी पुरी बुच यांनीही, आरोप हे खोटे, दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हटले होते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक्स या समाज माध्यमावर म्हटले आहे की, चिनी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात सेबी अध्यक्ष मुळीच मागे नाहीत. बुच यांच्याकडून होणारे नवे खुलासे म्हणजे त्यांनी यापूर्वी बरीच माहिती दडवून ठेवली, हेच सूचित होते, असे काँग्रेसने म्हटले आहे. माधबी पुरी-बुच यांनी भारताबाहेर केलेल्या गुंतवणुकीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कल्पना तरी आहे का, असा सवालही करण्यात आला आहे. चीनच्या धोरणावर पंतप्रधान टीका करत असतानाच्या कालावधीत बुच यांनी केलेली गुंतवणूक म्हणजे आश्चर्यकारक घटना असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.