मंदीच्या भीतीने सेन्सेक्स भुईसपाट; अमेरिकेत मंदीचे सावट, १५ लाख काेटी रुपयांचा फटका

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत आर्थिक मंदीचे सावट जाणवू लागल्याने सोमवारी जगभरातील भांडवली बाजार कोसळले.
मंदीच्या भीतीने सेन्सेक्स भुईसपाट; अमेरिकेत मंदीचे सावट, १५ लाख काेटी रुपयांचा फटका
File photo
Published on

मुंबई : जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत आर्थिक मंदीचे सावट जाणवू लागल्याने सोमवारी जगभरातील भांडवली बाजार कोसळले. भारतातही त्याचे पडसाद उमटून सेन्सेक्स व निफ्टी भुईसपाट झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सप्ताहारंभीच्या सत्रात जवळपास ३ टक्क्यांनी घसरला. गेल्या दोन महिन्यांतील या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना एकाच सत्रात १५ लाख कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले.

सेन्सेक्स शुक्रवारच्या तुलनेत सोमवार अखेर २,२२२.५५ अंकांनी घसरून ७८,७५९.४० वर स्थिरावला, तर ६६२.१० अंक घसरणीसह निफ्टी २४,०५५.६० वर बंद झाला. दोन्ही निर्देशांक गेल्या महिन्याभराच्या तळात विसावले. त्यातील एकाच सत्रातील ही गेल्या दोन महिन्यांतील सर्वात मोठी आपटी ठरली. यापूर्वी ४ जून २०२४ मध्ये सेन्सेक्स व निफ्टी कोसळले होते. देशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालामुळे दोन्ही निर्देशांक त्यावेळी ५ टक्क्यांनी आपटले होते.

गेल्या शुक्रवारीदेखील भारतीय भांडवली बाजार मोठ्या प्रमाणात आपटले होते. गेल्या सलग दोन सत्रातील मिळून निर्देशांकाची घसरण ४ टक्क्यांपर्यंतची नोंदली गेली आहे. सोमवारच्या घसरणीने गुंतवणूकदारांचे १५.३२ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. परिणामी, मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य ५.२७ लाख कोटी डॉलरवर आले आहे.

मुंबई शेअर बाजारातील एकूण कंपन्यांपैकी तब्बल ३,४१४ कंपन्यांचे शेअर खाली आले, तर ६६४ कंपन्यांचे शेअर वधारले. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील २,४५२ कंपन्यांचे समभाग घसरले. ३३२ कंपन्यांच्या शेअरचे मूल्य वाढले.

अमेरिकेतील रोजगार तसेच महागाईची विदारक स्थिती व्यक्त करणाऱ्या आकड्यांचा धसका घेऊन गुंतवणूकदारांनी आठवड्याची सुरुवात करताना समभाग विक्रीचा सपाटा लावला.

मुंबई शेअर बाजारातील स्मॉल कॅप ४.२१ टक्के, तर मिड कॅप निर्देशांक ३.६० टक्क्याने घसरला. मुंबई शेअर बाजारात किर्लोस्कर ब्रदर्सचा समभाग सर्वाधिक १२.३७ टक्क्यांनी आपटला. सर्वच क्षेत्रीय निर्देशांक घसरणीच्या यादीत होते.

अमेरिकेमुळे आशियातील प्रमुख शेअर बाजाराचे निर्देशांकही सोमवारी खाली आले. यामध्ये निक्कीचाही (-५.८ टक्के) समावेश राहिला. निक्कीने नुकताच तेजीचा विक्रम नोंदविला होता. यापूर्वी १९ ऑक्टोबर १९८७ मध्ये निक्की तब्बल १४.९ टक्क्यांनी आपटला होता. शांघाय, हाँगकाँग, टोकियो येथील प्रमुख निर्देशांकही सोमवारच्या सत्रात घसरले होते. तर युरोपातील बाजारांतदेखील सोमवारच्या सत्रात घसरण सुरू होती.

अमेरिकेतील रोजगाराबाबतची स्थिती स्पष्ट करणारी आकडेवारी विशेषत: भारतासाठी चिंताजनक असल्याचे नमूद करत त्याचाच विपरित परिणाम येथील शेअर बाजारात दिसून आल्याचे डीएसपी म्युच्युअल फंडच्या इक्विटी विभागाचे प्रमुख विनित सांबरे यांनी स्पष्ट केले.

व्याजदर निर्णयाची उत्सुकता

अमेरिकेतील मंदीसदृश स्थितीमुळे जपानसह अनेक देशातील केंद्रीय बँका व्याजदर वाढ करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे व्याजदर निश्चितीचे पतधोरणही येत्या गुरुवारीच जाहीर होत आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यापूर्वीच्या अनेक द्विमासिक पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवण्याचे धोरण अनुसरले आहे.

रुपयाचा विक्रमी तळ

शेअर बाजाराच्या पडझडीचा परिणाम सोमवारी परकीय चलन विनिमय बाजारातही नोंदला गेला. डॉलरच्या तुलनेत रुपया एकाच व्यवहारात ३७ पैशांची गटांगळी घेत ८४.०९ रुपयांपर्यंत खाली आला. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा हा विक्रमी तळ राहिला. जागतिक भांडवली बाजार आणि मध्य-पूर्वेतील भूराजकीय वातावरणामुळे डॉलरवर दबाव निर्माण झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in