नवी दिल्ली : विस्तारा आणि एअर इंडिया यांच्यातील विलीनीकरण करारासाठी सिंगापूर एअरलाइन्सला २,०५८.५ कोटी रुपयांच्या थेट विदेशी गुंतवणुकीची मंजुरी मिळाली आहे. सरकारकडून शुक्रवारी मंजुरी मिळाल्यानंतर सिंगापूर एअरलाइन्स विलीनीकरण करारानुसार २५.१ टक्के भागभांडवल विकत घेईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता हा करार या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. प्रस्तावित विलीनीकरणाची घोषणा नोव्हेंबर २०२२ मध्ये करण्यात आली. या विलीनीकरणानंतर स्थापन झालेल्या एअरलाइन्स जगातील सर्वात मोठ्या एअरलाइन समूहांपैकी एक असतील.
एअर इंडियाची मालकी टाटा समूहाची आहे आणि विस्ताराची मालकी टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्स या दोन्ही कंपन्यांच्या 51:49 टक्के हिस्सेदारीसह आहे. शुक्रवारी, सिंगापूर एअरलाइन्सने सिंगापूर स्टॉक एक्स्चेंजमध्ये नियामक फाइलिंगमध्ये सांगितले की, प्रस्तावित विलीनीकरणाचा एक भाग म्हणून विस्तारित एअर इंडियामध्ये थेट विदेशी गुंतवणुकीसाठी (एफडीआय) भारत सरकारकडून मान्यता मिळाली आहे. सिंगापूर एअरलाइन्सने सांगितले की प्रस्तावित विलीनीकरण २०२४ च्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
यापूर्वी विस्तारा-एअर इंडिया विलीनीकरण करार ३१ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. या कराराला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (एनसीएलटी) ने जूनमध्ये मंजुरी दिली होती. मार्चमध्ये, सिंगापूरच्या स्पर्धा नियामक सीसीसीएसने प्रस्तावित कराराला सशर्त मान्यता दिली. यापूर्वी सप्टेंबर २०२३ मध्ये या कराराला भारतीय स्पर्धा आयोगाकडून (सीसीआय) काही अटींसह मंजुरी मिळाली होती.
त्यानंतर, विस्तारा विमान एअर इंडियाद्वारे चालवले जाईल आणि या विमानांद्वारे चालवल्या जाणाऱ्या मार्गांचे बुकिंग एअर इंडियाच्या वेबसाइटवर पुनर्निर्देशित केले जाईल.