उद्योगाची संथगती! खाणकाम, वीजनिर्मितीतील सुमार कामगिरी, ऑक्टोबरमध्ये दर ३.५ टक्क्यांवर

भारताच्या औद्योगिक उत्पादन वाढीचा वेग ऑक्टोबर २०२४ मध्ये वर्षाच्या आधारे ३.५ टक्क्यांवर घसरला आहे. खाणकाम, वीज उत्पादन आणि उत्पादन क्षेत्रातील कामगिरी सुमार ठरल्याने वार्षिक तुलनेत यंदा ही वाढ मंदावली आहे.
उद्योगाची संथगती! खाणकाम, वीजनिर्मितीतील सुमार कामगिरी, ऑक्टोबरमध्ये दर ३.५ टक्क्यांवर
Published on

नवी दिल्ली : भारताच्या औद्योगिक उत्पादन वाढीचा वेग ऑक्टोबर २०२४ मध्ये वर्षाच्या आधारे ३.५ टक्क्यांवर घसरला आहे. खाणकाम, वीज उत्पादन आणि उत्पादन क्षेत्रातील कामगिरी सुमार ठरल्याने वार्षिक तुलनेत यंदा ही वाढ मंदावली आहे.

गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, वर्षभरापूर्वी- ऑक्टोबर २०२३ मध्ये औद्योगिक उत्पादन वाढ ११.९ टक्के होती. तर गेल्या महिन्यात हा दर काहीसा कमी -३.१ टक्के होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या निवेदनानुसार, अनुक्रमिक आधारावर, ऑक्टोबर २०२४ मध्ये कारखान्यांचा उत्पादन दर सप्टेंबरमधील ३.१ टक्क्यांवरून ३.५ टक्क्यांवर गेला असून यावर्षी ऑगस्टमध्ये ०.१ टक्के घट नोंदली गेली होती.

एप्रिल-ऑक्टोबर २०२४ कालावधीत औद्योगिक उत्पादन वाढीच्या आधारावर कारखान्यांचा उत्पादन दर ४ टक्के होता. तो मागील वर्षीच्या याच कालावधीत ७ टक्के होता, असे आकडेवारीत दिसून आले आहे.

नव्या आकडेवारीनुसार, खाणकाम क्षेत्राचा उत्पादन दर ऑक्टोबरमध्ये ०.९ टक्क्यांवर घसरला असून मागील वर्षीच्या याच महिन्यात १३.१ टक्के विस्तार झाला होता. उत्पादन क्षेत्राचा विकास दरही १०.६ टक्क्यांवरून ४.१ टक्क्यांवर घसरला आहे.

वीज निर्मितीमध्येदेखील यंदा तीव्र घट दिसून आली असून विकास दर २०.४ टक्क्यांवरून २ टक्क्यांवर आला आहे. भांडवली वस्तूंच्या श्रेणीत वाढीचा दर ऑक्टोबर २०२४ मध्ये ३.१ टक्के होता, जो मागील वर्षी याच कालावधीत २१.७ टक्के होता.

यंदाच्या ऑक्टोबरमध्ये ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तूंच्या उत्पादनात वाढीचा दर २.७ टक्के होता. तो ऑक्टोबर २०२३ मध्ये ९.३ टक्के होता. तर ग्राहकोपयाेगी टिकाऊ वस्तूंच्या उत्पादनात ५.९ टक्के वाढ झाली असून ऑक्टोबर २०२३ मध्ये हा दर १५.९ टक्के होता.

गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, पायाभूत सुविधा, बांधकाम वस्तूंमध्ये ऑक्टोबर २०२४ मध्ये ४ टक्के वाढ झाली आहे. ती मागील वर्षी याच कालावधीत १२.६ टक्के होती. प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनात यावर्षी ऑक्टोबरमध्ये २.६ टक्के वाढ झाली असून मागील वर्षी हा दर ११.४ टक्के होता.

तर मध्यम वस्तूंच्या श्रेणीत ऑक्टोबरमध्ये ३.७ टक्के वाढ झाली असून, मागील वर्षी ती ९.५ टक्के होती, असे सांगण्यात आले.

चालू आर्थिक वर्षात आर्थिक वाढ ६.५ - ७ टक्के अपेक्षित : फिक्की

दुसऱ्या तिमाहीतील ५.४ टक्के जीडीपी वाढीचे ‘तात्पुरती घटना’ असे वर्णन करत फिक्कीचे अध्यक्ष हर्षवर्धन अगरवाल यांनी, भारताला चालू आर्थिक वर्षात ६.५ - ७ टक्के आर्थिक वाढ साध्य होईल व खाजगी गुंतवणुकीत वाढ होईल, अशी अपेक्षा आहे, गुरुवारी सांगितले. इमामी लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेले अगरवाल यांनी, महागाई आणि आर्थिक वाढ यामध्ये संतुलन साधण्यासाठी रिझर्व्ह बँकेला भक्कम योजना आखावी लागेल तसेच सध्याच्या धोरणांमध्ये काहीसे बदल करावे लागतील, असे नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in