शेअर बाजारात घोटाळा, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा खळबळजनक आरोप; संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी

भारताचा शेअर बाजार तेजीने वाढत आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ४ जूनला शेअर बाजार आणखी उंची गाठेल. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले पाहिजेत. प्रत्यक्षात ४ जूनला शेअर बाजारात प्रचंड घसरण होऊन किरकोळ गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले.
शेअर बाजारात घोटाळा, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा खळबळजनक आरोप; संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी

नवी दिल्ली : भारताचा शेअर बाजार तेजीने वाढत आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ४ जूनला शेअर बाजार आणखी उंची गाठेल. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले पाहिजेत. प्रत्यक्षात ४ जूनला शेअर बाजारात प्रचंड घसरण होऊन किरकोळ गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. शेअर बाजारात ३० लाख कोटींचा महाघोटाळा झाला आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला व या घटनेची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली. मोदी सरकार स्थापन होत असतानाच राहुल गांधी यांच्या या आरोपामुळे येणाऱ्या नवीन सरकारच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन शेअर बाजारात झालेल्या घोटाळ्याची पोलखोल केली. तसेच या घोटाळ्याला मोदी, शहा जबाबदार असून या प्रकरणी चौकशीची मागणी केली.

ते म्हणाले की, हा महाघोटाळा असून त्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी झाली पाहिजे. १ जूनला एक्झिट पोल जाहीर होतात. त्यात भाजपला सहज बहुमत मिळणार असल्याचे अंदाज व्यक्त होतात. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत त्यांना २२० जागा मिळत असल्याचे दिसत होते, तर गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार, त्यांना २००-२२० जागा मिळण्याची शक्यता होती. ३ जून रोजी शेअर बाजाराने विक्रम केला, तर ४ जूनला मोठी घसरण झाली. ३१ मे रोजी बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली. यामध्ये कोणता तरी घोटाळा आहे, असा अंदाज त्यांना होता. हजारो कोटी रुपये त्यात गुंतवले गेले. दोन दिवसांत ३० लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाला. यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी ४ जूनला सेन्सेक्स ४,३८९ अंकांनी घसरला. त्यात गुंतवणूकदारांचे ३० लाख कोटींचे नुकसान झाले. बीएसईच्या नोंदणीकृत कंपन्यांचे भागभांडवल ३९५ लाख कोटी रुपये झाले. ३ जूनला ते भागभांडवल ४२६ लाख कोटी रुपये होते.

तुम्ही याप्रकरणी कोर्टात जाणार का? यावर राहुल गांधी म्हणाले की, जी घटना घडली ती साधारण नाही. पंतप्रधान, गृहमंत्री व अर्थमंत्र्यांनी याबाबत संकेत दिले होते. अदानी यांच्या वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन याबाबत जनतेला संदेश दिला होता. त्यामुळे सामान्य जनतेने मोठी गुंतवणूक केली व ते यामध्ये भरडले गेले. त्यामुळे याप्रकरणी संयुक्त संसदीय समितीची आम्ही मागणी करत आहोत.

सर्वात जास्त खरेदी-विक्री झालेल्या समभागांच्या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी का? यावर ते म्हणाले की, शेअर बाजारात घोटाळा झाला हे एकदम स्पष्ट आहे. पंतप्रधान व गृहमंत्र्यांनी थेट सांगितले, शेअर बाजार वर जाणार आहे. शेअर्स खरेदी केले पाहिजेत. जेव्हा पंतप्रधान, गृहमंत्री सांगतात तेव्हा जनतेचा विश्वास बसतो. आपल्याला बहुमत मिळणार नाही, असे त्यांना माहिती होते. त्यांनी बाजाराला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप गांधी यांनी केला.

घोटाळ्याचा सामान्य गुंतवणूकदारांना फटका

तुम्ही पंतप्रधान, गृहमंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करत आहात, या प्रश्नावर गांधी यांनी सांगितले की, मी हवेत बोलत नाही. या प्रकरणाच्या चौकशीनंतर यातील सत्य बाहेर येईल. त्यासाठी खोटे ‘एक्झिट पोल’ जाहीर केले गेले. त्यामुळे लोकांनी बाजारात गुंतवणूक केली. त्यात घोटाळेबाजांचा फायदा झाला, तर सामान्य जनतेला फटका बसला. या प्रकरणात पंतप्रधान व गृहमंत्र्यांचा थेट संबंध आहे.

अदानींचा फायदा करायला हे पाऊल उचलले का? या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना राहुल म्हणाले की, नाही. पण, या प्रकरणाचा अदानी यांच्याशी संबंध असू शकतो. भाजपच्या मोठ्या नेत्यांनी गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदीचा संदेश दिला. ४ जूनला काय होणार आहे, याचा अंदाज त्यांना होता. यात किरकोळ गुंतवणूकदारांचे ३० लाख कोटी रुपये बुडाले आहेत. काही ठरावीक लोकांना लाखो कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशीची मागणी आम्ही केली.

शेअर बाजाराचा घोटाळा व अदानी यांच्या हिंडेनबर्ग प्रकरणाची एकाचवेळी चौकशी करावी का? यावर गांधी म्हणाले की, हा घोटाळा मोठा असून अदानींपेक्षाही अधिक व्यापक आहे. पंतप्रधान शेअर बाजाराबाबत आपले मत व्यक्त करतात हे इतिहासात पहिल्यांदाच झाले आहे. पंतप्रधान व गृहमंत्र्यांनी अनेकवेळा याबाबत वक्तव्य केल्याचे राहुल गांधी यांनी निदर्शनास आणून दिले.

२० मेच्या मुलाखतीत पंतप्रधानांनी केले वक्तव्य

२० मे रोजी ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान म्हणाले होते की, लोकसभेचे निकाल लवकरच जाहीर होतील. त्यादिवशी सत्तेत कोण येत आहे, हे शेअर बाजार दाखवून देईल. १० वर्षांपूर्वी आमचे सरकार आले, तेव्हा सेन्सेक्स २५ हजार होता. आता तो ७५ हजारांवर पोहोचला आहे. सार्वजनिक बँकांच्या समभागांचे मूल्य वाढले आहे. अनेक सरकारी कंपन्यांच्या समभागात दोन वर्षांत १० पट वाढ झाली आहे.

शेअर बाजार घोटाळ्याची ‘ईडी’मार्फत चौकशी करा, माजी अर्थ सचिव ईएएस सर्मा यांची केंद्राकडे मागणी

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी ४ जूनला शेअर बाजारात झालेल्या घोटाळ्याची ‘ईडी’मार्फत चौकशी करा, अशी मागणी माजी अर्थ सचिव ईएएस सर्मा यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ यांना पाठवलेल्या पत्रात सर्मा यांनी नमूद केले की, ३ व ४ जून रोजी शेअर बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेबाबत नियामक संस्था ‘सेबी’ने याबाबत कोणती कारवाई केली का? याची माहिती द्यावी. ३ जून रोजी शेअर बाजार अचानक वाढला. त्यानंतर ४ जून रोजी शेअर बाजार गडगडला. यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. शेअर बाजार अजूनही पूर्वपदावर आलेला नाही, असे सर्मा यांनी म्हटले आहे. १९९९-२००० काळात सर्मा हे वित्त खात्यात सचिव होते.

४ जून रोजी निकालाच्या दिवशी शेअर बाजार एकदम वर जाईल, असे वक्तव्य पंतप्रधानांनी केले होते. त्यामुळे गुंतवणूकदारांना याबाबत खरेदीचा इशारा मिळाला होता. आमचे सरकार परत येत असून आर्थिक सुधारणा कायम राहतील, असे त्यांनी सुचवले होते. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ४ जूनपूर्वी शेअर बाजारात गुंतवणूक करावी, असा सल्ला देऊन आगीत तेल ओतले.

या प्रकरणाची ईडी, सीबीआय व सीबीडीटी यांनी समन्वय साधून योग्य वेळेत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

राहुल यांचे आरोप बिनबुडाचे - गोयल

भारताच्या अर्थव्यवस्थेकडे संपूर्ण जग गंभीरतेने बघत आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान बनत असल्याने राहुल गांधी हे चिंताग्रस्त झाले आहेत. देशातील जनतेचा आता राहुल यांच्यावर विश्वास नाही. ते बिनबुडाचे आरोप करून गुंतवणूकदारांना संभ्रमात टाकत आहेत, असा आरोप भाजपचे नेते पियूष गोयल यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in