...म्हणून मोबाईलवरील बोलणे महागणार; टेलिकॉम कंपन्या २५ टक्के दरवाढ करणार!

...म्हणून मोबाईलवरील बोलणे महागणार; टेलिकॉम कंपन्या २५ टक्के दरवाढ करणार!

मोबाईल आता प्रत्येकाचा जीव की प्राण झालेला आहे. सतत मोबाईलवर बोलणे, इंटरनेट सर्फिंग, आवडत्या मालिका पाहणे, बँकिंग आदी सर्वच कामे हाताच्या बोटासरशी मोबाईलवर होत असतात.

नवी दिल्ली : मोबाईल आता प्रत्येकाचा जीव की प्राण झालेला आहे. सतत मोबाईलवर बोलणे, इंटरनेट सर्फिंग, आवडत्या मालिका पाहणे, बँकिंग आदी सर्वच कामे हाताच्या बोटासरशी मोबाईलवर होत असतात. आता याच मोबाईलवरील बोलणे महागण्याच्या तयारीत आहे. कारण कंपन्यांनी दूरसंचार स्पेक्ट्रमसाठी हजारो कोटी मोजले आहे. आता ती गुंतवणूक परत मिळवण्यासाठी मोबाईल कंपन्यांकडून भाडेवाढ अटळ असल्याचे दिसते. येत्या दसऱ्या, दिवाळीपासून मोबाईलवर बोलणे महाग होण्याची शक्यता आहे, असा अंदाज तज्ज्ञ ब्रोकरेज संस्थांनी व्यक्त केला.

वोडाफोन आयडियाने ३५१०.४ कोटी, जिओने ९७३.६२ कोटींचे स्पेक्ट्रम विकत घेतले. आता स्पेक्ट्रम खरेदी संपल्यानंतर सर्व मोबाईल कंपन्यांचे लक्ष आता मोबाईल दरवाढ करण्याकडे आहे. या कंपन्या लवकरच दरवाढ करतील, असे आयआयएफएल सिक्युरिटीज, जे. पी. मॉर्गन, कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज यांच्या अहवालात नमूद केले आहे.

दूरसंचार कंपन्या जुलै ते सप्टेंबर किंवा ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात २५ टक्के दरवाढ करण्याची शक्यता आहे, असे जे. पी. मॉर्गनच्या अहवालात सांगितले. देशात रिलायन्स जिओ व भारती एअरटेल या दोन कंपन्यांकडे या क्षेत्रातील ७८ टक्के महसूलाचा ताबा आहे. २०२६ पर्यंत तो ८३ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. कोटक सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, भारती एअरटेल ही या क्षेत्रातील कार्यक्षम कंपनी आहे. तिने ९७ मेगाहर्ट‌्झ स्पेक्ट्रम घेतला आहे. त्यासाठी कंपनीने ६९०० कोटी तर वोडाफोनने ३५०० कोटी रुपये मोजले आहे.

सरकारच्या अधिकृत माहितीनुसार, १४१.४ मेगाहर्ट‌्झ स्पेक्ट्रम ११,३४०.७८ कोटी रुपयांना विकल्या गेल्या आहेत. सरकारने १० गिगाहर्ट‌्झ स्पेक्ट्रमसाठी ९६,२३८ कोटी रुपयांची मूळ किंमत निश्चित केली होती.

logo
marathi.freepressjournal.in