आधी भरती...आता लोकेशनही ठरलं! शोरुमसाठी Tesla ने निवडल्या दोन जागा

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांच्या मालकीची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाने भारतात एंट्री करण्याच्या दृष्टीकोनातून अजून एक पाऊल पुढे टाकले आहे.
आधी भरती...आता लोकेशनही ठरलं! शोरुमसाठी Tesla ने निवडल्या दोन जागा
एक्स @arslanyousofzai
Published on

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांच्या मालकीची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाने भारतात एंट्री करण्याच्या दृष्टीकोनातून अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. अलीकडेच कंपनीने भारतात १३ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आणि आता कंपनीने आपले शोरुम उघडण्यासाठी दोन जागाही जवळपास निश्चित केल्या आहेत.

'रॉयटर्स'ने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भारतात प्रवेशासाठी आपले रिटेल आउटलेट सुरू करण्यासाठी टेस्लाने दिल्ली आणि मुंबई या दोन शहरांची निवड केली आहे. टेस्लाने नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एरोसिटी परिसरात शोरूमसाठी भाडेतत्त्वावर जागा निवडली आहे. एरोसिटी परिसरात हॉटेल्स, रिटेल आउटलेट आणि जागतिक कॉर्पोरेशनची कार्यालये आहेत. मुंबईत, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात जागा निवडण्यात आली आहे. हा परिसर बिझनेस आणि रिटेल हब म्हणून ओळखला जातो आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आहे. दिल्ली आणि मुंबई दोन्ही शोरूम सुमारे ५,००० स्क्वेअर फूट (४६४.५२ स्क्वेअर मीटर) आकाराचे असतील.

आऊटलेट्स उघडण्याच्या तारखा अद्याप ठरलेल्या नाहीत, परंतु टेस्लाने "इम्पोर्टेड EVs भारतात विकण्याची योजना आखली आहे... या जागा शोरूमसाठी आहेत, सेवा केंद्रांसाठी नाहीत, टेस्ला हे आउटलेट चालवेल" असेही या वृत्तात म्हटले आहे. तथापि, टेस्लाने अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, वरील माहितीवरुन टेस्ला सुरुवातीला गाड्या आयात करून विक्री सुरू करणार असल्याचे जवळपास स्पष्ट होत आहे.

भारतीय बाजारपेठेत प्रवेश का?

टेस्लाने भारतात उत्पादन सुरू करण्याबाबत यापूर्वी अनेकदा विचार केला होता, पण आयात शुल्काच्या (Import Duties) उच्च दरांमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला. मात्र, अलीकडेच सरकारने आलिशान ईव्ही वाहनांवरील मूलभूत कस्टम ड्युटी ११०% वरून ७०% पर्यंत कमी केली आहे, यामुळे भारतीय बाजारपेठेतील संधी अधिक आकर्षक बनल्या आहेत. टेस्ला सुरुवातीला गाड्या आयात करून विक्री सुरू करेल आणि नंतर मागणी आणि सरकारी धोरणांवर अवलंबून स्थानिक उत्पादनाबाबत निर्णय घेईल.

दरम्यान, टेस्लाचे CEO इलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नुकत्याच अमेरिकेत झालेल्या भेटीनंतर अलीकडेच टेस्लाने भारतात भरती प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई आणि दिल्ली येथे १३ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यात सेवा तंत्रज्ञ (Service Technicians), ग्राहक सल्लागार (Advisory Roles), ग्राहक संपर्क व्यवस्थापक (Customer Engagement Manager), आणि वितरण संचालन तज्ञ (Delivery Operations Specialists) यांसारख्या ग्राहकसंबंधित आणि तांत्रिक पदांचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in