Modi 3.0 Budget 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर आज नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) संसदेत सादर करत आहेत. जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतोय, मात्र भारताची अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत असल्याचे निर्मला सीतारामन म्हणाल्या. गरीब, शेतकरी, महिला, तरुण यांच्यावर सरकारचा फोकस असल्याचं त्या म्हणाल्या.
रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर सरकारचा भर असल्याचं निर्मला सीतारामन म्हणाल्या. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने पाच नव्या योजनांची घोषणा त्यांनी केली. तसेच रोजगार निर्मितीसाठी दोन लाख कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली गेली आहे. याशिवाय शिक्षण तसेच कौशल्य विकासासाठी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद देखील अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसेच देशामध्ये महागाईचा दर कमी असून असून तो चार टक्क्यांपर्यंत पोहोचवण्याचं सरकारचं लक्ष आहे
निर्मला सीतारामन यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच अर्थसंकल्पामध्ये प्राधान्य कशाला असेल हे स्पष्ट केले. अर्थसंकल्पात ९ प्राधान्यांवर भर दिला जाईल असं त्यांनी सांगितलं. यामध्ये शेती, रोजगार, MSME, कौशल्य आणि मध्यमवर्ग यांचा समावेश आहे. अर्थसंकल्पाच्या ९ प्राधान्यांमध्ये उत्पादकता, नोकऱ्या, सामाजिक न्याय, शहरी विकास, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि सुधारणांचा समावेश आहे.
रोजगार, कौशल्य, एमएसएमई, मध्यमवर्ग यावर भर देणारा अर्थसंकल्प आहे. भारताचा आर्थिक विकास हा चमकदार अपवाद राहिला आहे, पुढील काही वर्षांतही तसाच राहील असंही निर्मला सीतारामन यांनी सांगितलं अर्थसंकल्पातील ९ प्राधान्यांमध्ये शेतीमध्ये उत्पादकता आणि लवचिकता, रोजगार आणि कौशल्य, सुधारित मानवी संसाधने, सामाजिक न्याय, उत्पादन आणि सेवा, शहर विकास, नागरी विकास, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा, नवकल्पना, संशोधन आणि विकास, पुढच्या पिढीसाठी सुधारणा यांचा समावेश असणार आहे.
शेतीला प्रथम प्राधान्य देण्यात आलं असून एक कोटी शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेतीची सुरुवात केली जाईल. कडधान्ये आणि बियाण्यांचे उत्पादन मजबूत करण्यासाठी मिशन सुरू केले जाणार आहे. कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. औपचारिक क्षेत्रात नव्याने काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना 1 महिन्याचे वेतन प्रदान करण्यात येईल.
देशातील महागाईवर निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की, महागाईच्या ४ टक्क्याच्या लक्ष्याचा आपण जवळ पोहोचलो आहोत. आपलं लक्ष सर्वसमावेशक वाढीवर आहे. या विचारासह महागाईविरोधातला लढा सुरू आहे. सरकार सर्व प्रकारच्या वाढीसाठी कटिबद्ध असल्याचंही निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.