मुंबई : फिनटेक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार धोरणात्मक पातळीवर विविध उपाययोजना करत असल्याने या क्षेत्राने गेल्या १० वर्षांत ३१ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक आकर्षित केली. फिनटेक स्टार्टअपमध्ये ५०० टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक वाढली. तसेच एंजल टॅक्स रद्द करणे हे देखील या विभागाच्या वाढीच्या दिशेने एक पाऊल आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले.
पंतप्रधान मोदी हे मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024’ (जीएफएफ २०२४) ला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी नियामकांना सायबर फसवणूक थांबवण्यासाठी आणि लोकांमध्ये डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी अधिक उपाययोजना करण्यास सांगितले.
ते म्हणाले की, भारतात सणासुदीचा हंगाम आहे, अर्थव्यवस्था आणि बाजारपेठांमध्येही उत्सवी वातावरण आहे, मजबूत जीडीपी वाढ आणि भांडवली बाजार नवीन उच्चांक गाठत आहे.
जगातील सर्वात मोठी मायक्रोफायनान्स योजना प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत २७ लाख कोटी रुपयांची कर्जे वितरीत करण्यात आल्याची माहितीही मोदींनी यावेळी दिली.
या कार्यक्रमात आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, डिजिटल तंत्रज्ञान आर्थिक समावेशाचा विस्तार करण्यासाठी, कार्यक्षमता सुधारण्यात आणि देशभरात रिअल टाइम सेवा सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. आज, भारत डिजिटल पेमेंटमध्ये जागतिक नेता म्हणून उभा आहे, हे नावीन्यपूर्ण धोरण आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसह सक्रिय धोरण तयार करून साध्य केले गेले आहे. धोरणकर्ते, नियामक आणि नवोन्मेषक यांच्यातील सहयोग हा भारताच्या फिनटेक प्रवासाचा निर्णायक घटक आहे, असे दास म्हणाले.
आमची फिनटेक विविधता पाहून जग आश्चर्यचकित
फिनटेकच्या बाबतीत भारताची विविधता पाहून जग आश्चर्यचकित झाले आहे. एक काळ होता जेव्हा लोक आमची सांस्कृतिक विविधता पाहून आश्चर्यचकित व्हायचे. आता लोक भारतात येतात आणि आमची फिनटेक विविधता पाहून आश्चर्यचकित होतात. विमानतळावर उतरा, स्ट्रीट फूडपासून शॉपिंगपर्यंत भारताची फिनटेक क्रांती सर्वत्र दिसून येते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी केले.
मोदी म्हणाले की, पूर्वी संसदेत लोक विचारायचे की देशात बँकांच्या पुरेशा शाखा नाहीत. खेड्यापाड्यात बँका उपलब्ध नाहीत. इंटरनेट सेवा उपलब्ध नाहीत. फिनटेक क्रांती कशी येईल? ते माझ्यासारख्या चायवाल्यांना हे विचारायचे. आता एका दशकात ब्रॉडबँड वापरकर्ते ६० दशलक्ष (६ कोटी) वरून ९४० (९४ कोटी) दशलक्ष झाले आहेत.
बँकिंग सेवा २४ तास, आठवड्याचे सातही दिवस
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताची फिनटेक क्रांती आर्थिक समावेशात सुधारणा करण्यासोबतच नवनिर्मितीला प्रोत्साहन देत आहे. भारताचा यूपीआय संपूर्ण जगात फिनटेकचे एक मोठे उदाहरण बनले आहे. आज गाव असो वा शहर, हिवाळा असो किंवा बर्फवृष्टी असो, भारतात बँकिंग सेवा २४ तास, सात दिवस आणि १२ महिने सुरू असते. मोदी यांनी दोन-तीन दिवसांपूर्वीच १० वर्षे झालेल्या जन-धन खाती महिला सक्षमीकरणासाठी एक उत्तम माध्यम बनली आहेत. याअंतर्गत २९ कोटींहून अधिक महिलांची बँक खाती उघडण्यात आली आहेत. जन धन खात्यांमुळे महिलांसाठी बचत आणि गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. या खात्यांच्या आधारे आम्ही मुद्रा योजना सुरू केली, ही मायक्रो फायनान्सची सर्वात मोठी योजना आहे. या योजनेच्या ७० टक्के लाभार्थी महिला आहेत. जनधन खात्यामुळे देशातील १० कोटी ग्रामीण महिलांना महिलांच्या स्वयंसेवी गटांचा लाभ मिळत आहे. त्याचा अर्थ फिनटेकने समांतर अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया घातला आहे.
डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शकता : पंतप्रधान
आम्ही डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतात पारदर्शकता आणली असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आज शेकडो सरकारी योजनांतर्गत थेट लाभ हस्तांतरण केले जाते. त्यामध्ये यंत्रणेतून होणारी गळती थांबली आहे. आज लोक औपचारिक व्यवस्थेत सामील होण्यात स्वतःचे फायदे पाहतात. फिनटेकमुळे भारतात झालेला बदल हा केवळ तंत्रज्ञानापुरता मर्यादित नाही. त्याचा सामाजिक प्रभाव खूप व्यापक आहे. त्यामुळे गाव आणि शहर यांच्यातील दरी कमी होण्यास मदत झाली आहे. आर्थिक सेवांचे लोकशाहीकरण करण्यात फिनटेकनेही मोठी भूमिका बजावली आहे, असेही ते म्हणाले.