घेतलेल्या कर्जाच्या दुप्पट वसुली बँकांनी केली आहे; फरार उद्योगपती विजय मल्ल्याचा दावा

"६,२०३ कोटींच्या कर्जाविरोधात १४,१३१.८ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. ती माझ्या ब्रिटनमधील दिवाळखोरी रद्द अर्जामध्ये पुरावा म्हणून वापरली जाईल. इंग्लंडमधील न्यायालयात बँका काय सांगतील याची उत्सुकता आहे"
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रएएनआय
Published on

नवी दिल्ली : भारतातील बँकांच्या ताब्यात माझी १४,१३१.६ कोटी रुपयांची संपत्ती असून ती सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या दुप्पट आहे, असा दावा फरार मद्य सम्राट विजय मल्ल्या याने केला आहे. यासंबंधी मल्ल्याने सोशल मीडियावर एक पोस्ट देखील केली आहे.

अर्थ मंत्रालयाच्या वार्षिक अहवाल २०२४-२५ मध्ये कर्ज न फेडणाऱ्यांविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या मालमत्ता जप्तीचा संदर्भ देत मल्ल्याने सांगितले की, बँकांनी ६,२०३ कोटी रुपयांच्या कर्जाविरोधात १४,१३१.८ कोटी रुपये वसूल केले आहेत.

मल्ल्या याने म्हटले आहे की, ६,२०३ कोटींच्या कर्जाविरोधात १४,१३१.८ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. ती माझ्या ब्रिटनमधील दिवाळखोरी रद्द अर्जामध्ये पुरावा म्हणून वापरली जाईल. इंग्लंडमधील न्यायालयात बँका काय सांगतील याची उत्सुकता आहे, असेही मल्ल्याने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

फरार आर्थिक गुन्हेगारांबाबतच्या तपशीलांमध्ये मल्ल्यासह आणखी १० जणांचा समावेश आहे. अहवालात नमूद आहे की, ३६ व्यक्तींविरुद्ध एकूण ४४ प्रत्यार्पण विनंती विविध देशांना पाठवण्यात आल्या आहेत. अर्थ मंत्रालयाच्या वार्षिक अहवालानुसार, विजय मल्ल्या प्रकरणात १४,१३१.६ कोटी रुपयांच्या जप्त मालमत्तांचा संपूर्ण भाग सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना यशस्वीरित्या परत करण्यात आला आहे. तपास यंत्रणांच्या प्रयत्नांमुळे परदेशी न्यायालयात प्रभावी प्रतिनिधित्व झाले असून त्यामुळे अनेक फरार आर्थिक गुन्हेगार व आरोपींच्या प्रत्यार्पणात यश मिळाले आहे, असे अहवालात नमूद आहे.

logo
marathi.freepressjournal.in