घाऊक महागाईचा १६ महिन्यांचा उच्चांक; भाज्या महागल्याने जूनमध्ये दर ३.३६ टक्क्यांवर

अन्नपदार्थ, विशेषतः भाजीपाला आणि उत्पादित वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे जूनमध्ये घाऊक महागाईचा दर १६ महिन्यांच्या उच्चांकी ३.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : अन्नपदार्थ, विशेषतः भाजीपाला आणि उत्पादित वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे जूनमध्ये घाऊक महागाईचा दर १६ महिन्यांच्या उच्चांकी ३.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे. घाऊक महागाई दराचा चढता आलेख असलेला हा सलग चौथा महिना आहे. मे महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) आधारित महागाई दर २.६१ टक्के होता. जून २०२३ मध्ये तो (-) ४.१८ टक्के होता. तसेच घाऊक दर महागाई फेब्रुवारी २०२३ मध्ये ३.८५ टक्क्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. यंदा म्हणजे जून २०२४ मध्ये घाऊक महागाई वाढण्याचे कारण म्हणजे प्रामुख्याने खाद्यपदार्थांच्या किमती, खाद्यपदार्थांच्या उत्पादन खर्चात वाढ, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू, खनिज तेल, इतर उत्पादन इत्यादींमध्ये वाढ होणे हे आहे, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे.

तेलाच्या किमतींच्या संदर्भात त्या म्हणाल्या की, कच्च्या तेलाचे भारतातील दरात सरासरी किमती आतापर्यंत आणि जुलै २०२४ मध्येही बरीच अस्थिर राहतील कारण मागणी-पुरवठ्याच्या विसंगतीमुळे आणि मासिक आधारावर ११ जुलैपर्यंत कच्च्या तेलाच्या दरात ८६.६ अमेरिकन डॉलर प्रति बॅरल राहिले. कच्च्या तेलाच्या उच्च किमती चालू महिन्यात घाऊक महागाई वाढवू शकतात, असेही त्या म्हणाल्या. इंधन आणि उर्जा बास्केटमध्ये, महागाई दर १.०३ टक्के असून मे महिन्याच्या १.३५ टक्क्यांपेक्षा तो किरकोळ कमी आहे. तथापि, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ या महिन्यात दुहेरी अंकात १२.५५ टक्क्यांनी झाली.

निर्मिती क्षेत्रांमध्ये जून महिन्यात महागाई दर १.४३ टक्क्यांवर होता, जो मे महिन्यातील ०.७८ टक्क्यांपेक्षा जास्त होता. जूनमधील घाऊक महागाई दरात वाढ ही किरकोळ महागाईच्या आकडेवारीनुसार होती. किरकोळ चलनवाढीचा दर जूनमध्ये ५.१ टक्क्यांच्या चार महिन्यांतील उच्चांकावर पोहोचला, असे गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या आकडेवारीवरून दिसून आले.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) पतधोरण जाहीर करताना प्रामुख्याने किरकोळ महागाई दराचा विचार करते. त्यामुळे किरकोळ आणि घाऊक महागाई दरात वाढ झाल्याने रिझर्व्ह बँकेची पतधोरणविषयक समिती आगामी पतधोरणात व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याची शक्यता आहे.

खाद्यपदार्थांचा महागाई दर १०.८७ टक्क्यांनी वाढला

आकडेवारीनुसार, जूनमध्ये खाद्यपदार्थांचा महागाई दर १०.८७ टक्क्यांनी वाढला असून मेमध्ये हा दर ९.८२ टक्के होता. जून महिन्यात भाज्यांची महागाई वाढून ३८.७६ टक्के होती, जी मे महिन्यात ३२.४२ टक्के होती. कांद्याचा भाव ९३.३५ टक्क्यांनी वाढला, तर बटाट्याचा भाव ६६.३७ टक्क्यांनी वधारला. जूनमध्ये डाळींच्या महागाईत २१.६४ टक्क्यांनी वाढ झाली. जून महिन्यात फळे १०.१४ टक्के, तृणधान्ये ९.२७ टक्के आणि दूध ३.३७ टक्के महागले. जून २०२४ मध्ये घाऊक महागाई दर वाढला कारण इंधन आणि ऊर्जा वगळता सर्व प्रमुख विभागांमध्ये महागाई दर वाढला, असे ‘इक्रा’च्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ अदिती नायर यांनी सांगितले. पुढे त्या म्हणाल्या की, अनुकूल वातावरण आणि जागतिक वस्तूंच्या किमतींमध्ये काहीशी घसरण होण्याच्या अपेक्षेने घाऊक महागाई दर जुलै २०२४ मध्ये सुमारे २ टक्क्यांपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे.

logo
marathi.freepressjournal.in