मुंबई : कारला आग लागण्याची अनेक कारणे असू शकतात. साधारणपणे वाहनाच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट किंवा एखाद्या बिघाडामुळं कारला आग लागू शकते. पण याशिवाय आणखी काही कारणांमुळेही वाहनांना आग लागण्याचा धोका वाढतो. जुन्या वाहनांमध्ये वायरिंग आणि बॅटरीतील बिघाडांमुळे आग लागल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे अपघात झाल्यास आगीचा धोका वाढतो.
याशिवाय लांबच्या मार्गावर बराच वेळ वाहनं चालवल्यानं, टायर आणि रस्ता यांच्यातील घर्षणामुळं आगीच्या घटना घडल्याचं काही ठिकाणी दिसून आलं आहे. अशा घटना बहुधा एक्स्प्रेस वेवर घडल्या आहेत. एक्स्प्रेस वेच्या बांधकामात काँक्रीट किंवा सिमेंटचा वापर केला जातो. तर पारंपरिक रस्त्यांमध्ये बिटुमेनचा वापर केला जातो.
काँक्रीटचे रस्ते टायरच्या घर्षणाच्या वेळी जास्त उष्णता निर्माण करतात. ज्यामुळे टायरचं स्ट्रक्चर वेगानं खराब होतं. अशा स्थितीत टायर फुटण्याची शक्यता वाढते. चालत्या कारचा टायर रस्त्याच्या थेट संपर्कात असतो आणि घर्षणामुळं टायरचं तापमान लक्षणीयरित्या वाढतं. कधीकधी टायरमधून जळल्यासारखा वास येऊ लागतो. याची वेळीच काळजी न घेतल्यास वाहनाला आग लागू शकते.
हायब्रीड कारमध्ये आगीचा धोका जास्त? :
AutoInsuranceEZ च्या अभ्यासानुसार, हायब्रीड कारमध्ये आग लागण्याचा धोका पेट्रोल-डिझेल आणि इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत जास्त असतो. अमेरिकन संस्थेच्या या अभ्यासात, नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्डाने 2020 पासून रिकॉल केलेल्या वाहनांच्या डेटाचं विश्लेषण करण्यात आले. या विश्लेषणात असं म्हटलं आहे की, विक्री केलेल्या वाहनांच्या प्रति 1 लाख युनिटमध्ये, हायब्रीड कारमध्ये आग लागण्याच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पेट्रोल आणि तिसऱ्या क्रमांकावर इलेक्ट्रिक वाहने होती.
बहुतेक इलेक्ट्रिक वाहने अद्याप जुन्या पेट्रोल-डिझेल वाहनांच्या वयापर्यंत पोहोचलेली नसल्यामुळं ती जुनी झाल्यावर बॅटरी आणि विद्युत स्फोटाचा धोका जास्त असेल की नाही हे दर्शविणारा कोणताही डेटा सध्या उपलब्ध नाही. परंतु इलेक्ट्रिक वाहनांमध्ये जास्त चार्जिंग आणि उच्च-तापमानामुळे बॅटरीला आग लागण्याचा धोका असतो. अलिकडच्या काळात भारतातही अशी काही प्रकरणं पाहण्यात आली आहेत, ज्यामध्ये इलेक्ट्रिक कार आणि स्कूटरला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.
आफ्टरमार्केट सीएनजी फिटिंग धोकादायक:
दुसरीकडे सीएनजी गाड्यांना आग लागण्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत. तथापि, कंपनीनं बसवलेल्या सीएनजी कार अधिक सुरक्षित मानल्या जातात. परंतु अनेक वेळा लोक त्यांच्या कारमध्ये आफ्टरमार्केट सीएनजी किट बसवतात. हे खूप धोकादायक आहे. कारण कार कंपन्या सर्व मानकांनुसार वाहने तयार करतात. यामध्ये कारचे वजन, आकार-डिझाइन इत्यादी सर्व गोष्टींचा समावेश असतो. दुसरीकडे बाजारातील सीएनजी फिटिंगदरम्यान या गोष्टी लक्षात घेतल्या जात नाहीत.
काहीवेळा सीएनजी इंधन पंपाच्या व्हॉल्व्ह किंवा नोझलमधील गळतीमुळे आगीचा धोकाही वाढतो. याशिवाय सीएनजी कारमध्ये कारच्या मागील बाजूस सिलिंडर दिला जातो. त्यामुळं वाहनाला मागून टक्कर झाल्यावर ते स्फोटकासारखं काम करतं. सीएनजी हा अत्यंत ज्वालाग्राही वायू असल्यानं आग काही क्षणातच संपूर्ण कारला कवेत घेऊ शकते.
कारला आग लागण्याची काही कारणेः
कारची एखाद्या दुसऱ्या वाहनाची टक्कर झाल्यानं आग लागण्याचा धोका असतो.
इलेक्ट्रिकल बिघाड किंवा शॉर्ट सर्किट.
तेल किंवा गॅस गळती.
पेट्रोल-डिझेल किंवा सीएनजी गाड्यांमध्ये इंजिन जास्त गरम होणे.
कारची अयोग्य देखभाल.
कारमध्ये लायटर, सिगारेट इत्यादी धुम्रपान सामग्रीचा वापर.
वाहनाच्या बॅटरीचं नुकसान.
कारच्या वायरिंगशी छेडछाड करणं
सेंट्रल लॉकिंग...आग आणि बचाव?
आजच्या आधुनिक कारमध्ये, सेंट्रल लॉकिंग सिस्टीम ही आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी आणि धोकादायकही दोन्ही आहे. काही प्रकरणात हे देखील पाहिले जाऊ शकते की कारला आग लागताच, सेंट्रल लॉकिंग सिस्टम जाम होते. आगीमुळे, इलेक्ट्रॉनिक्स वायरिंग खराब होते आणि योग्यरित्या कार्य करत नाही. त्यामुळे सेंट्रल लॉकिंग सिस्टीम काम करत नाही आणि गाडीचा प्रवासी बाहेर पडू शकत नाही. अशा स्थितीत तुमच्या कारमध्ये नेहमी एक छोटा हातोडा ठेवा जेणेकरून कारची खिडकी तुटून गाडीतील व्यक्ती बाहेर पडू शकेल. याशिवाय गाडीत अग्निशामक यंत्र ठेवा जे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडू शकते.
चालत्या कारमध्ये आग लागल्यास काय करावे:
कारमधून धूर किंवा धुराचा वास येत असल्यास, ताबडतोब आपले वाहन रस्त्याच्या कडेला थांबवा.
कारचे इंजिन बंद करा आणि ताबडतोब कारमधून बाहेर पडा.
जर दरवाजे जाम झाले असतील तर घाबरू नका आणि खिडकी तोडून बाहेर येण्याचा प्रयत्न करा.
बाहेर आल्यानंतर, कारपासून दूर उभे रहा आणि आग विझण्याची वाट पहा.
चुकूनही गाडीचे बोनेट उघडण्याचा प्रयत्न करू नका, त्यामुळे आग लागू शकते.
यावेळी, पोलिसांना किंवा अग्निशमन दलाला कॉल करा आणि त्यांना माहिती द्या.