
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली असून न्याय विभागाला जवळपास ५० वर्षे जुन्या कायद्याची अंमलबजावणी थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. याच कायद्यांतर्गत अदानी समूहाविरोधात लाचखोरीची चौकशी सुरू करण्यात आली होती.
ट्रम्प यांनी १९७७च्या फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ॲक्टची अंमलबजावणी थांबवण्याचा आदेश दिला आहे. हा कायदा अमेरिकन कंपन्या आणि विदेशी कंपन्यांना व्यवसाय मिळवण्यासाठी वा टिकवण्यासाठी परदेशी अधिकाऱ्यांना लाच देण्यास प्रतिबंध करतो.
ट्रम्प यांच्या आदेशातील महत्त्वाचे मुद्दे
१८० दिवसांचे पुनरावलोकन : कायद्यांतर्गत चौकशी आणि कारवाईच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश.
नवीन चौकशींना स्थगिती : पुनरावलोकन पूर्ण होईपर्यंत नवीन चौकशी सुरू केली जाणार नाही. मात्र विशेष परिस्थितीत अपवाद केला जाऊ शकतो.
मागील प्रकरणांचे पुनरावलोकन : न्याय विभागाने प्रलंबित कायदा प्रकरणांचे परीक्षण करून योग्य ती कारवाई करावी.
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार कारवाई : पुनरावलोकनानंतर नवीन धोरण ठरवले जाईल आणि त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.