मोठ्या संख्येने जागतिक कंपन्यांची भारतात गुंतवणुकीची इच्छा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

अनेक जागतिक कंपन्या भारतात गुंतवणूक करू इच्छितात आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारांनी आपापसात स्पर्धा करावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले.
मोठ्या संख्येने जागतिक कंपन्यांची भारतात गुंतवणुकीची इच्छा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
पीटीआय
Published on

नवी दिल्ली : अनेक जागतिक कंपन्या भारतात गुंतवणूक करू इच्छितात आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारांनी आपापसात स्पर्धा करावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले.

७८ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात भेटलेल्या बहुतेक लोकांना भारतात गुंतवणूक करायची होती. भारताला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनवण्याची ही सुवर्णसंधी आहे. राज्य सरकारांना सुशासन आणि कायदा व सुव्यवस्था राखताना गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी धोरणे तयार करण्याचे त्यांनी आवाहन केले.

मोदी पुढे म्हणाले की, देशाला ‘डिझाइन इन इंडिया’ आणि ‘डिझाइन फॉर द वर्ल्ड’वर काम करण्याची गरज आहे. भारतीय व्यावसायिकांनी वाढत्या जागतिक गेमिंग उद्योगाचे नेतृत्व केले पाहिजे. इंडस्ट्री 4.0 क्रांतीशी सुसंगतपणे सरकारचे लक्ष सर्वसमावेशक कौशल्य विकासावर, शेतीपासून स्वच्छतेपर्यंत प्रत्येक क्षेत्रावर आहे. तसेच ‘स्किल इंडिया’ कार्यक्रमाद्वारे भारत विकास करत असून नवीन गती मिळत आहे, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले की, ‘वोकल फॉर लोकल’ हा भारताच्या अर्थतंत्राचा (अर्थव्यवस्था) मंत्र बनला आहे. ‘एक जिल्हा, एक उत्पादन’सह, प्रत्येक जिल्ह्याला आता आपल्या उत्पादनाचा अभिमान वाटतो आणि निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशाने, एका विशिष्ट उत्पादनामध्ये अग्रेसर होण्यासाठी आपली अद्वितीय ताकद ओळखण्याचा प्रयत्न करतो, असे ते म्हणाले. ऊर्जा क्षेत्रात ‘आत्मनिर्भर’ बनण्यासाठी आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी देश अथक प्रयत्न करत आहे, असेही मोदी म्हणाले.

जागतिक स्तरावरील निवडक मजबूत बँकांमध्ये भारतीय बँका

नवी दिल्ली : आपल्या सरकारने केलेल्या मोठ्या सुधारणांमुळे जागतिक स्तरावर मजबूत असलेल्या काही बँकांमध्ये भारतीय बँकांचा समावेश झाला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले. मध्यमवर्ग, शेतकरी, गृहखरेदीदार, स्टार्टअप्स आणि एमएसएमई क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मजबूत बँकिंग प्रणाली महत्त्वाची आहे, यावर त्यांनी भर दिला. ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, मजबूत बँकिंग प्रणाली अर्थव्यवस्थेला बळ देते. पूर्वी बँकिंग क्षेत्र कठीण काळातून जात होते, परंतु आता या विभागात वाढ होत आहे. आमच्या बँकिंग क्षेत्राची काय स्थिती होती याची जरा कल्पना करा. कोणतीही वाढ नव्हती, विस्तार नव्हता आणि बँकिंग व्यवस्थेवर विश्वास नव्हता. आमच्या बँका कठीण काळातून जात होत्या. बँकिंग क्षेत्रात आम्ही मोठ्या सुधारणा केल्या. आज सुधारणांमुळे आमच्या बँकांचा जागतिक पातळीवरील काही मजबूत बँकांमध्ये समावेश झाला आहे, असे मोदी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in