
नवी दिल्ली : एप्रिलपासून कारच्या किमती वाढणार आहेत. मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, हुंडई यांसारख्या प्रमुख वाहन उत्पादक कंपन्यांनी इनपूट कॉस्ट आणि ऑपरेशनल खर्च वाढल्यामुळे गाड्यांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.
डेलॉइटचे ऑटोमोबाइल तज्ज्ञ रजत महाजन यांच्या मते, भारतात दरवर्षी दोन वेळा कारच्या किमती कॅलेंडर वर्षाच्या सुरुवातीला आणि आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला वाढतात. गेल्या सहा महिन्यांत डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ३% घटले आहे, त्यामुळे आयात केलेल्या घटकांची किंमत वाढली आहे.
उच्च प्रमाणात आयात-आधारित उत्पादनांवर याचा मोठा परिणाम होतो. प्रथमच कार खरेदी करणारे आणि ग्रामीण ग्राहकांमधील मागणी मंदावली आहे, त्यामुळे कंपन्यांवर मार्जिन राखण्याचा दबाव आहे. प्रीमियम कार सेगमेंटमध्ये किंमत वाढवून कंपन्या नफा वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारमध्ये सातत्याने नवीन फीचर्स जोडले जात असल्याने गेल्या काही तिमाहींपासून नियमित दरवाढ होत आहे. एंट्री लेव्हल गाड्यांच्या ग्राहकांमध्ये किंमत वाढीबाबत मोठी संवेदनशीलता असते. त्यामुळे कंपन्या दरवाढ करताना सावधगिरी बाळगत आहेत.
अलीकडच्या बजेटमुळे ग्राहकांकडे अधिक पैसा शिल्लक राहणार असल्याने या सेगमेंटमध्ये मागणी वाढू शकते. आयसीआरएचे उपाध्यक्ष रोहन कंवर गुप्ता यांच्या मते, कॅलेंडर किंवा आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला कंपन्या किंमत वाढवतात कारण त्यांना ऑपरेशनल खर्च, महागाई आणि कच्च्या मालाच्या किमतीतील वाढ यांचा भार कमी करायचा असतो.
या दरवाढीमुळे काही प्रमाणात ग्राहकांकडून वाहन मागणी मंदावू शकते. मात्र, कार उत्पादक कंपन्या सध्या विविध मॉडेल्सवर मोठ्या सवलती देत आहेत. त्यामुळे एकूण परिणाम फार मोठा होण्याची शक्यता नाही.
मारुती सुझुकीची ४% दरवाढ
देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया पुढील महिन्यापासून आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती ४% पर्यंत वाढवणार आहे. सध्या मारुती सुझुकी आपल्या अल्टो के-१० (४.२३ लाख रुपये) पासून इनव्हिक्टो (२९.२२ लाख रुपये) (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंतच्या विविध गाड्या विकते.
हुंदाई, टाटा, महिंद्राचा दरवाढीचा निर्णय
हुंदाई मोटर इंडिया - एप्रिल २०२५ पासून गाड्यांच्या किमती ३% पर्यंत वाढणार
टाटा मोटर्स - प्रवासी वाहनांच्या (ईव्हीसह) किमती एप्रिल २०२५ पासून वाढवणार
महिंद्रा अँड महिंद्रा - एसयूव्ही आणि व्यावसायिक वाहनांच्या किमती ३% पर्यंत वाढवणार
किआ इंडिया, होंडा कार्स इंडिया, रेनो इंडिया, बीएमडब्ल्यू यांचीही किमतवाढी घोषणा