
अहमदाबाद : देशातील वित्तसंस्था, नियामकांकडे १.८४ लाख कोटी रुपये विनादाव्याचे पडून आहेत. ही मालमत्ता त्यांच्या खऱ्या मालकांपर्यंत पोहचवण्यासाठी 'आपले पैसे, आपला हक्क' या तीन महिन्यांच्या अभियानाचा शुभारंभ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला.
गुजरातचे वित्तमंत्री कनुभाई देसाई आणि बँका तसेच अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीतारामन यांनी गांधीनगर येथून 'आपले पैसे, आपला हक्क' या तीन महिन्यांच्या अभियानाचा शुभारंभ केला.
या वेळी अर्थ व उद्योग व्यवहार मंत्री सीतारामन म्हणाल्या की, बँका व नियामक संस्थांकडे बँक ठेवी, विमा, भविष्यनिर्वाह निधी आणि समभाग या स्वरूपात १.८४ लाख कोटी रुपयांच्या मालमत्ता पडून आहेत.
या तीन महिन्यांच्या मोहिमेदरम्यान तीन 'A' -जागरूकता (Awareness), प्रवेश (Access) आणि कृती (Action) यावर भर द्यावा, ज्यामुळे ही रक्कम खऱ्या मालकांपर्यंत पोहोचू शकेल. ही निष्क्रिय रक्कम बँकांमध्ये, आरबीआयकडे किंवा गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधीत पडून आहे. आपण त्या पैशांचे योग्य हक्कदार शोधून त्यांच्यापर्यंत ती रक्कम पोहोचवली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
अर्थ सेवा विभागाच्या माहितीनुसार, सध्या १.८४ लाख कोटी रुपये वित्तसंस्थांमध्ये पडून आहेत. ती रक्कम पूर्णपणे सुरक्षित आहे. योग्य कागदपत्रांसह तुम्ही आलात, की ती तुम्हाला मिळेल. सरकार या रकमेचे केवळ संरक्षक आहे. ती बँका, सेबी किंवा इतर कोणत्याही संस्थेकडे असू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. अनेक कारणांमुळे जर ही संपत्ती दीर्घकाळ दावा न केल्याने पडून राहिली, तर ती एका संस्थेकडून दुसऱ्या संस्थेकडे हस्तांतरित होते, असे त्यांनी सांगितले. "ठेवींच्या बाबतीत ती आरबीआयकडे जाते, तर शेअर्ससारख्या मालमत्तेच्या बाबतीत ती सेबीकडून गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधीकडे जाते," असे त्या म्हणाल्या.
त्या म्हणाल्या की, आरबीआयने 'उद्गम' हे पोर्टल तयार केले आहे. ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या निष्क्रिय ठेवी शोधणे सुलभ होईल. 'तुम्ही एकदा दावा केलात की ती रक्कम लगेच मिळेल. त्यामुळे आता सर्वांनी या उपक्रमाबद्दल माहिती पसरवणे गरजेचे आहे,' असे त्यांनी आवाहन केले.
जनतेत जागृती निर्माण करा
सीतारामन म्हणाल्या की, शासन आणि बँक अधिकाऱ्यांनी जनतेत जाऊन जागरूकता निर्माण करावी, जेणेकरून ते स्वतःच्या निष्क्रिय मालमत्तेचा दावा करू शकतील. जनतेला सांगा की, तुमचे पैसे तिथे पडले आहेत. ही कागदपत्रे घेऊन जा आणि पैसे परत घ्या. तुम्ही दूत म्हणून काम करा आणि लोकांना पोर्टलवर नोंदणी करायला प्रवृत्त करा. सीतारामन म्हणाल्या की, गुजरात ग्रामीण बँकेने मला आश्वासन दिले आहे की, त्यांचे अधिकारी राज्यातील प्रत्येक गावात जाऊन बँकेत पडून असलेल्या निष्क्रिय ठेवींचे योग्य मालक शोधतील,' असे त्या म्हणाल्या.