सुप्रसिद्ध लोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले यांनी ४२ वर्षांच्या कारकिर्दीत नाटकाचे १३, ३३३ प्रयोग पूर्ण केले. त्यांच्या 'शिकायला गेलो एक’ या नाटकाचा विशेष प्रयोग पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात रविवारी (दि. १६) पार पडला. या निमित्ताने दामले यांनी महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्तांसाठी १३ लाख ३३३ रुपयांची मदत मुख्यमंत्री साहाय्यता निधीकडे सुपूर्द केली. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रशांत दामले यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटले, "माझ्या कारकीर्दीतील १३, ३३३वा प्रयोग १६ नोव्हेंबर रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. आजवर माझ्या प्रत्येक प्रयोगाला जसा रसिकप्रेक्षकांचा प्रतिसाद असतो तसाच उदंड प्रतिसाद आणि प्रेम मला यावेळीही अनुभवता आलं. या विशेष कार्यक्रमावेळी एक 'खारीचा वाटा' म्हणून, माझ्याकडून आणि समस्त नाट्यरसिकांच्या वतीने महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्तांना १३ लाख ३३३ रुपयांची मदतही मुख्यमंत्री साहाय्यता निधीला दिली."
विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
इतकेच नव्हे तर त्यांच्या १३,३३३ व्या प्रयोगानिमित्त त्यांचे नाव विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आले. प्रशांत दामले यांनी ४२ वर्ष नाटकांमध्ये अविरत काम केले. सर्वाधिक नाटकांत काम करणारी व्यक्ती म्हणून त्यांच्या नावावर नवा विक्रम नोंदवण्यात आला. ते मराठी रंगभूमीत सर्वाधिक नाटक सादर करणारे 'विक्रमादित्य' कलाकार ठरले आहेत. त्यांच्या नावावर या आधीही दिवसाला सर्वाधिक नाट्यप्रयोग आणि वर्षाला सर्वाधिक नाट्यप्रयोग करणारी व्यक्ती म्हणून विक्रम नोंदवण्यात आले आहेत.
विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अध्यक्षा मिस इंडिया डॉ. ईशा अग्रवाल आणि १८४ जागतिक विक्रम करणारे पहिले भारतीय डॉ. दीपक हरके यांनी बालगंधर्व रंगमंदिर येथे प्रशांत दामले यांना या विश्वविक्रमासाठी प्रमाणपत्र प्रदान केले.