मुंबई : मुंबईच्या इतिहासातील ती काळरात्र आजही विसरता येणं शक्य नाही. २६ नोव्हेंबर २००८ रोजी नेहमीप्रमाणे धावणाऱ्या मुंबईत अचानक गोळीबाराचे आवाज घुमले. समुद्रमार्गे आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या १० दहशतवाद्यांनी सीएसएमटी, ताज हॉटेल, ओबेरॉय-ट्रायडंट आणि नरिमन हाऊससह अनेक ठिकाणी मृत्यूचं थैमान घातलं. कुठे लोक जीव वाचवण्यासाठी धावत होते, तर कुठे हॉटेलमध्ये अडकलेले पाहुणे मदतीची वाट पाहत होते. सुमारे ६० तास चाललेल्या या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो जण जखमी झाले. या हल्ल्यात मुंबई पोलिस आणि सुरक्षा दलांतील अनेक अधिकारी व जवानांनीही प्राण गमावले. तर अजमल कसाब हा एकमेव दहशतवादी जिवंत पकडला गेला. आज या भीषण हल्ल्याला १८ वर्षं पूर्ण झाली, तरी त्या काळरात्रीच्या आठवणी मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. या हल्ल्यातील पोलिस आणि जवानांचं शौर्य, ताज हॉटेलमधील थरार, सर्वसामान्यांचा संघर्ष आणि कसाबविरोधातील न्यायालयीन लढाई पुढे अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांसमोर आली. प्रत्येक कलाकृतीने या हल्ल्याची एक वेगळी बाजू मांडली. जाणून घेऊया, २६/११ च्या आठवणी जागवणारे हे चित्रपट आणि वेब सीरिज कोणते आहेत.
१. द अटॅक्स ऑफ २६/११ (The Attacks of 26/11)
प्रदर्शित : २०१३
राम गोपाल वर्मा दिग्दर्शित या चित्रपटात नाना पाटेकर यांनी तत्कालीन मुंबई पोलिस सहआयुक्त राकेश मारिया यांची भूमिका साकारली आहे. समुद्रमार्गे दहशतवाद्यांचं मुंबईत आगमन, विविध ठिकाणी झालेला गोळीबार, अजमल कसाबला पकडण्याची घटना आणि पोलिसांचा तपास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. मुंबईवर झालेल्या हल्ल्याचा घटनाक्रम समजून घेण्यासाठी हा चित्रपट महत्त्वाचा ठरतो.
कुठे पाहता येईल? - जिओहॉटस्टार आणि ॲमेझॉन एमएक्स प्लेयर.
२. हॉटेल मुंबई (Hotel Mumbai)
प्रदर्शित : २०१८; भारतात २०१९
देव पटेल आणि अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात ताज महाल पॅलेस हॉटेलमधील दहशतवादी हल्ला दाखवण्यात आला आहे. हॉटेलमध्ये अडकलेले पाहुणे आणि त्यांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालणारे कर्मचारी यांच्याभोवती चित्रपटाची कथा फिरते. बाहेर दहशतवाद्यांचा गोळीबार सुरू असताना आत अडकलेल्या लोकांची भीती, धडपड आणि हॉटेल कर्मचाऱ्यांनी दाखवलेलं धैर्य यातून समोर येतं.
कुठे पाहता येईल? - झी५.
३. मेजर (Major)
प्रदर्शित : २०२२
अदिवी शेष यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एनएसजीचे शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावर आधारित आहे. लहानपणापासून सैन्यात दाखल होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास आणि २६/११ च्या हल्ल्यावेळी ताज हॉटेलमध्ये राबवण्यात आलेली बचाव मोहीम यात दाखवली आहे. दहशतवाद्यांविरोधात लढताना त्यांनी दाखवलेलं शौर्य आणि केलेलं सर्वोच्च बलिदान हा चित्रपटाचा मुख्य विषय आहे.
कुठे पाहता येईल? - नेटफ्लिक्स.
४. भारत भाग्य विधाता (Bharat Bhhagya Viddhaata)
प्रदर्शित : २०२६
कंगना रणौत यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मुंबईतील कामा आणि आल्ब्लेस रुग्णालयाशी संबंधित आहे. २६/११ च्या हल्ल्यावेळी रुग्णालयात निर्माण झालेली भीती आणि रुग्णांना सुरक्षित ठेवण्यासाठी परिचारिका, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी व सुरक्षा रक्षकांनी केलेले प्रयत्न यात दाखवले आहेत. कंगना यांनी परिचारिका गीता माधव गंधारे यांची भूमिका साकारली आहे. संकटाच्या काळात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या धैर्याला या चित्रपटातून उजाळा देण्यात आला आहे.
कुठे पाहता येईल? - झी५.
५. प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम (Prahaar: The Untold Story of Ujjwal Nikam)
प्रदर्शित : २०२६
१६ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात राजकुमार राव यांनी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे. २६/११ च्या हल्ल्यात जिवंत पकडलेल्या अजमल कसाबविरुद्ध चाललेला खटला आणि त्याला शिक्षा मिळवून देण्यासाठी झालेली कायदेशीर लढाई चित्रपटात मांडण्यात आली आहे. हल्ल्यानंतर न्यायालयात काय घडलं, पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे खटला कसा पुढे गेला, याची नाट्यमय मांडणी यात पाहायला मिळते.
कुठे पाहता येईल? - चित्रपट प्रदर्शित झाला असला, तरी त्याच्या ओटीटी प्रदर्शनाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
६. ताज महाल (Taj Mahal)
प्रदर्शित : २०१५
हा फ्रेंच चित्रपट मुंबईतील ताज हॉटेलमध्ये अडकलेल्या एका तरुणीची कथा सांगतो. तिचे आई-वडील बाहेर गेलेले असताना हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला सुरू होतो. खोलीबाहेर गोळीबाराचे आवाज ऐकू येतात आणि ती मदतीची वाट पाहत जीव वाचवण्याचा प्रयत्न करते. हल्ल्याच्या वेळी एकट्या व्यक्तीच्या मनात निर्माण होणारी भीती आणि असहायता या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे.
७. वन लेस गॉड (One Less God)
प्रदर्शित : २०१७
'मुंबई सीज : ४ डेज ऑफ टेरर' या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या ऑस्ट्रेलियन चित्रपटात २६/११ च्या हल्ल्यावेळी ताज हॉटेलमध्ये अडकलेल्या परदेशी पाहुण्यांची कहाणी दाखवण्यात आली आहे. अचानक झालेला गोळीबार, बाहेर पडण्याचे बंद झालेले मार्ग आणि जीव वाचवण्यासाठी सुरू असलेली धडपड या चित्रपटात पाहायला मिळते. वेगवेगळ्या देशांतून आलेल्या पर्यटकांनी अनुभवलेली दहशत हा चित्रपटाचा मुख्य भाग आहे.
८. बांधोन (Baandhon)
प्रदर्शित : २०१२
जाह्नू बरुआ दिग्दर्शित या आसामी चित्रपटात २६/११ च्या हल्ल्यानंतर नातवाचा शोध घेणाऱ्या एका वृद्ध जोडप्याची कथा दाखवण्यात आली आहे. मुंबईतील हल्ल्यामुळे त्यांचा नातू बेपत्ता होतो आणि त्याच्या शोधासाठी दोघांची धडपड सुरू होते. हा चित्रपट प्रत्यक्ष गोळीबारापेक्षा हल्ल्यानंतर कुटुंबीयांच्या आयुष्यात निर्माण झालेलं दुःख, चिंता आणि अनिश्चितता यावर अधिक भर देतो.
९. फँटम (Phantom)
प्रदर्शित : २०१५
सैफ अली खान आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २६/११ च्या हल्ल्यानंतरच्या काल्पनिक गुप्त मोहिमेवर आधारित आहे. मुंबईवर हल्ला घडवून आणणाऱ्या सूत्रधारांवर कारवाई करण्यासाठी एका भारतीय अधिकाऱ्याला गुप्त मोहिमेवर पाठवलं जातं. त्यानंतर परदेशात घडणाऱ्या घटनांभोवती चित्रपटाची कथा फिरते. प्रत्यक्ष हल्ल्यापेक्षा त्यानंतरच्या प्रतिकाराची काल्पनिक कहाणी यात दाखवण्यात आली आहे.
कुठे पाहता येईल? प्राइम व्हिडीओ आणि जिओहॉटस्टारवर उपलब्ध असल्याची नोंद आहे.
१०. धुरंधर (Dhurandhar)
प्रदर्शित : २०२५
रणवीर सिंहची प्रमुख भूमिका असलेल्या आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ येतो. हल्ल्यावेळी दहशतवादी आणि त्यांच्या सूत्रधारांमध्ये झालेल्या संभाषणांचा वापर कथानकात करण्यात आला आहे. मात्र, हा संपूर्ण चित्रपट मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावर आधारित नाही. त्याची मुख्य कथा गुप्तहेर कारवाया आणि दहशतवादी नेटवर्कभोवती फिरते.
कुठे पाहता येईल? - नेटफ्लिक्स आणि जिओहॉटस्टार.
११. मुंबई डायरीज २६/११ (Mumbai Diaries 26/11)
प्रदर्शित : २०२१
मोहित रैना आणि कोंकणा सेन शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या वेब सीरिजमध्ये २६/११ च्या हल्ल्यादरम्यान मुंबईतील सरकारी रुग्णालयात निर्माण झालेली परिस्थिती दाखवण्यात आली आहे. एकीकडे दहशतवाद्यांचा हल्ला सुरू असताना दुसरीकडे रुग्णालयात जखमींची संख्या वाढत असते. डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी मर्यादित साधनांमध्ये रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी संघर्ष करताना दिसतात. या सीरिजमधील काही पात्रं आणि प्रसंग काल्पनिक आहेत.
कुठे पाहता येईल? - ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ.
१२. स्टेट ऑफ सीज : २६/११ (State of Siege: 26/11)
प्रदर्शित : २०२०
या वेब सीरिजमध्ये २६/११ च्या हल्ल्यावेळी राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एनएसजी कमांडोंनी राबवलेल्या मोहिमांवर भर देण्यात आला आहे. ताज हॉटेल, ओबेरॉय-ट्रायडंट आणि नरिमन हाऊस येथे अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी सुरक्षा दलांनी केलेले प्रयत्न यात दाखवले आहेत. दहशतवाद्यांचा सामना करताना जवानांना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं, याची नाट्यमय मांडणी या सीरिजमध्ये आहे.
कुठे पाहता येईल? - झी५.
चित्रपट आणि वेब सीरिजव्यतिरिक्त २६/११ च्या हल्ल्यावरील काही माहितीपटही महत्त्वाचे आहेत. 'टेरर इन मुंबई' (२००९) या माहितीपटात दहशतवादी आणि त्यांच्या सूत्रधारांमधील संभाषणांच्या नोंदी, हल्ल्यातून बचावलेल्या लोकांचे अनुभव आणि प्रत्यक्ष घटनांचा आढावा घेण्यात आला आहे. तर 'सर्व्हायव्हिंग मुंबई' (२००९) या माहितीपटात हल्ल्यात अडकलेल्या नागरिकांनी मृत्यूच्या दाढेतून कशी सुटका करून घेतली, यावर भर देण्यात आला आहे.
मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १८ वर्षं पूर्ण झाली असली, तरी त्या काळरात्रीच्या आठवणी आजही मन हेलावून टाकतात. या चित्रपटांनी कधी पोलिसांचं शौर्य, कधी जवानांचं बलिदान, तर कधी सर्वसामान्य नागरिकांचा संघर्ष पडद्यावर आणला. काही चित्रपटांमध्ये खऱ्या घटनांबरोबरच काल्पनिक प्रसंगांचाही समावेश आहे. मात्र, या वेगवेगळ्या कथांमधून मुंबईने अनुभवलेल्या त्या भीषण हल्ल्याची आणि त्याला धैर्याने सामोरं गेलेल्या लोकांची आठवण आजही जिवंत राहते.
ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपटांची उपलब्धता, भाषा आणि सदस्यत्वाच्या अटी काळानुसार बदलू शकतात.