मुंबई : भारत-पाकिस्तान संघर्ष निवळला असला, तरी तुर्कस्तानच्या भूमिकेमुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. तुर्कीने पाकिस्तानला ड्रोनच्या स्वरूपात दिलेल्या मदतीनंतर भारतात 'राष्ट्रप्रथम' म्हणत अनेकांनी तुर्कस्तानसोबतचे व्यवहार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा अप्रत्यक्ष फटका आता अभिनेता आमिर खान याच्यावरही बसताना दिसतोय. आमिर खानच्या आगामी चित्रपटावर 'बॉयकॉट'ची मोहिम सुरु झाली आहे.
#BoycottSitaareZameenPar हा हॅशटॅग समाजमाध्यमांवर ट्रेंड होतो आहे. यामागचं प्रमुख कारण म्हणजे आमिर खानने लालसिंग चड्ढा या चित्रपटावेळी तुर्कीच्या पहिल्या महिला एमीन एर्दोगान यांची भेट घेतली होती. त्यावेळी आमिर टॉम हँक्सच्या फॉरेस्ट गंपचा रिमेक असलेल्या लाल सिंग चड्ढा चित्रपटाच्या शूटिंगसाठी त्या देशात होता. त्याची छायाचित्रे आणि बातम्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या असून, त्यावरून आमिरवर देशविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केला जात आहे.
‘लालसिंग चड्ढा’प्रमाणेच झळ बसणार?
‘लालसिंग चड्ढा’ प्रदर्शित होताना आमिर खानला तुर्कस्तानच्याच कारणाने प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यावेळी सोशल मीडियावर चाललेल्या बहिष्कार मोहीमेमुळे चित्रपटाला प्रेक्षकांची फारशी साथ मिळाली नव्हती. आता ‘सितारे जमीन पर’ या नवीन चित्रपटालाही त्याच प्रकारचा विरोध होतो की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे.
चित्रपटाची पार्श्वभूमी आणि वाद
‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट दिव्यांग मुलांच्या आयुष्यावर आधारित असून, आमिर खान या चित्रपटात त्यांच्या बास्केटबॉल संघाचा प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे. तुर्कीच्या बहिष्कारासोबतच दुसऱ्या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याचे कारण म्हणजे २०२३ मध्ये आलेल्या हॉलीवूडपट ‘Champions’ या चित्रपटाची कथानक 'कॉपी' केल्याचे सोशल मीडियावर काही यूजर्सने म्हटले आहे. त्यामुळे कथानकाची मौलिकता, बहिष्काराचं सावट आणि आमिर खानची प्रतिमा या सर्व गोष्टी मिळून चित्रपटाच्या यशावर परिणाम करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रदर्शनाची तारीख
‘सितारे जमीन पर’ २० जून २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. सामाजिक संदेश असलेल्या या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र सोशल मीडियावरील नकारात्मक वातावरण आणि तुर्कीशी संबंधित वाद यामुळे तो बॉक्स ऑफिसवर कितपत यशस्वी ठरेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.