पती-पत्नीच्या नात्यातील कटुतेतून खुनाच्या सुपारीपर्यंत पोहोचलेली कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘आतली बातमी फुटली’ हा नवाकोरा मराठी चित्रपट. या चित्रपटाचा दुसरा रंजक टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यात गूढ, रहस्य, विनोद आणि थरार यांचा उत्तम मेळ पाहायला मिळतो.
या टिझरमध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव आपल्या विनोदी शैलीत गंभीर प्रसंग रंगवताना दिसतो. तर मोहन आगाशे यांचे संवाद आणि सिद्धार्थची देहबोली यातून प्रसंग अधिक उठून दिसतात.
विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार दिग्दर्शित या चित्रपटात मोहन आगाशे, रोहिणी हट्टगंडी आणि सिद्धार्थ जाधव हे तीन दिग्गज कलाकार प्रथमच एकत्र आले आहेत. त्यांच्यासोबत विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे आणि त्रिशा ठोसर यांची दमदार साथ आहे.
१९ सप्टेंबर २०२५ रोजी ‘आतली बातमी फुटली’ हा चित्रपट प्रदर्शित होईल. नात्यांमधील अविश्वास, फसवणूक आणि त्यामागील धक्कादायक सत्य उघड करत हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भन्नाट मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे.