
अभिनेता सलमान खानच्या ब्लॉकबस्टर 'दबंग' चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनव कश्यप पुन्हा चर्चेत आला आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सलमानला थेट गुंड, बेशिस्त आणि उद्धट प्रवृत्तीचा माणूस असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर अभिनवने सलमानच्या कुटुंबावरदेखील थेट टीका करत अनेक गंभीर आरोप केलेत.
अभिनव कश्यपने ‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत सलमान खानविषयी अनेक धक्कादायक आरोप केले. तो म्हणाला की, “सलमानला अभिनयात काहीही रस नाही. गेली २५ वर्षे तो फक्त कामावर येऊन लोकांवर उपकार करतोय अशी त्याची वृत्ती आहे. त्याला अभिनयापेक्षा सेलिब्रिटी असण्याची ताकद महत्त्वाची वाटते. तो कधीही खऱ्या अर्थाने चित्रपटात सहभागी होत नाही. 'दबंग' करण्यापूर्वी मला हे ठाऊक नव्हतं. तो एक गुंड आहे. तो उद्धट आणि वाईट माणूस आहे.”
बदला घेण्याची खुनशी प्रवृत्ती असलेलं कुटुंब
यावेळी त्याने खान कुटुंबावरही थेट निशाणा साधला. “बॉलिवूडमध्ये स्टार सिस्टीम उभारण्यामागे सलमान आणि त्यांचं कुटुंब जबाबदार आहे. पन्नास वर्षांपासून या इंडस्ट्रीत असलेलं हे कुटुंब केवळ स्वतःचं वर्चस्व टिकवून ठेवत आलं आहे. बदला घेण्याची खुनशी प्रवृत्ती त्यांच्यात ठासून भरलेली आहे. कोणी त्यांच्याशी असहमत झालं, तर ते त्याच्यामागे लागतात. त्यांना लोकांना त्यांच्या ताब्यात ठेवायचं असतं,” असा आरोप अभिनवने केला.
अनुराग कश्यपने दिली होती 'वॉर्निंग'
अभिनव कश्यप हा दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा धाकटा भाऊ आहेत. अभिनवने सांगितलं की, ‘दबंग’ करण्यापूर्वीच अनुरागने मला सलमानसोबत काम करणं कठीण जाईल असा इशारा दिला होता. मात्र त्यामागचं कारण त्याने स्पष्ट केलं नव्हतं. त्याला फक्त एवढंच ठाऊक होतं की मी सहज त्रस्त होईन, कारण त्याने या सगळ्याचा आधीच अनुभव घेतला होता. २००३ साली ‘तेरे नाम’चित्रपटाच्या वेळी त्याच्यासोबत हा प्रकार घडला होता. अनुरागने या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली होती, पण प्रोड्युसर बोनी कपूर यांनी त्याच्याशी गैरवर्तन केलं आणि त्याला प्रोजेक्ट सोडावा लागला. जवळपास तसंच काहीसं माझ्याही बाबतीत घडलं.’
खान कुटुंबाने दिली होती करिअर संपवण्याची धमकी
‘दबंग’ सुपरहिट ठरल्यानंतर २०१० मध्ये खान कुटुंबाने अभिनवला त्याचा दुसरा भाग दिग्दर्शित करण्याची ऑफर दिली होती. मात्र त्याने हा प्रस्ताव नाकारला. अभिनवचा आरोप आहे की, “मी ‘दबंग २’ करण्यास नकार दिल्यानंतर खान कुटुंबाने माझं करिअर संपवून टाकण्याची धमकी दिली होती.” हे प्रकरण झाल्यापासूनच अभिनव सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात उघडपणे बोलताना दिसतो.
दरम्यान, अभिनव कश्यपच्या आरोपांवर सलमान खानने मात्र अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.