ती माझी इंडस्ट्रीतील पहिली मैत्रीण... प्रिया मराठेच्या आठवणीत प्रार्थना बेहेरे भावूक; Insta पोस्ट चर्चेत

Actress Prarthana Behere on Priya Marathe death : जिवलग मैत्रीण गमावल्याच्या दुःखात प्रार्थनाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. म्हणाली, ए वेडे...
ती माझी इंडस्ट्रीतील पहिली मैत्रीण... प्रिया मराठेच्या आठवणीत प्रार्थना बेहेरे भावूक; Insta पोस्ट चर्चेत
Published on

अभिनेत्री प्रिया मराठेच्या अकाली निधनाने संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे. ‘पवित्र रिश्ता’ या गाजलेल्या मालिकेत तिने वर्षा ही लक्षवेधी भूमिका साकारली होती. याच मालिकेत तिच्यासोबत अभिनेत्री प्रार्थना बेहरेही झळकली होती, जिथे दोघी ऑनस्क्रीन बहिणींच्या भूमिकेत दिसल्या. प्रार्थनाची इंडस्ट्रीमधली पहिली खरी मैत्रीण प्रिया होती आणि ही मैत्री त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत जपली. जिवलग मैत्रीण गमावल्याच्या दुःखात प्रार्थनाचे डोळे पाणावले होते. आज प्रियाच्या आठवणीत तिने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या...

प्रार्थनाची भावनिक पोस्ट -

ए वेडे

प्रिया , पियू , परी , प्री ,

ती माझ्यासाठी फक्त एक सहकलाकार नव्हती, ती माझ्या अतिशय जिव्हाळ्याच्याची मैत्रीण होती. माझी वेडे ... ❤️

आम्ही एकत्र घर शेअर केलं होतं. कितीतरी वेळा आम्ही तासन्‌तास बोलत बसायचो…

मॅगी, भुर्जी, कॉफी… हे सगळं आमचं छोटंसं जग होतं.

खूप साऱ्या गप्पा, काहीसं वेडं हसणं, रात्री उशिरा पर्यंत जागणं - त्या क्षणांना काही तोड नाही.

ती माझी इंडस्ट्रीतील पहिली मैत्रीण होती आणि खरी सख्खी मैत्रीण.

तिच्यामुळेच हे नवीन जग मला आपलंसं वाटलं. तिच्यासोबतच मी स्वतःला शोधलं, हसावं, रडावं आणि मोकळं व्हावं असं वाटलं.

अभिनयाच्या सुरुवातीच्या दिवसांत जेव्हा सर्व काही नवीन, अनोळखी वाटायचं, तेव्हा तिचं हसतं मुख चेहरा , तिचं प्रेमळ बळ माझ्यासोबत होतं. तिच्यासोबत मी पहिला सीन केला, पहिल्यांदा camera शेअर केला ,

ती इतकी हसमुख , प्रामाणिक, भावनाशील आणि जिव्हाळ्याने भरलेली व्यक्ती होती की तिच्यासोबत क्षणभरही घालवला, तरी तो कायमचा लक्षात राहिला.

कॅन्सरशी लढा देत असताना, एक वेळ अशी आली होती की तिची तब्येत थोडीशी सुधारली. तेव्हा ती माझ्या अलिबागच्या घरी आली होती.

मी, ती आणि शाल्मली - आम्ही तिघींनी एकत्र इतका सुंदर वेळ घालवला की तो क्षण कायमचा मनात कोरला गेला आहे.

ती खूप आनंदी होती…

तेव्हा तिने मला एका शांत स्वरात म्हटलं,

“तुझं घर, तुझं वातावरण, तुझे हे कुत्रे… हे सगळं मला बरे करतंय. मला इथे येऊन बरं वाटतंय… जणू काही हे ठिकाणच मला heal करतंय.”

कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं, पण तिचं मन, तिचा आत्मा, तिचं खंबीरपणं -ते कोणतंही आजार हरवू शकला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत तिने जगायला आणि हसवायला शिकवलं.

ती गेली, पण तिच्या आठवणी, तिचं हास्य, तिचं अभिनयातलं तेज - सगळं अजूनही माझ्यासोबत आहे.

माझ्या आयुष्याचा एक भाग तिच्यासोबतच गेला, आणि तो भाग मी जपून ठेवणार आहे - कायमचा.

प्रियाच्या जाण्यानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर तिच्या आठवणींना उजाळा देत भावना व्यक्त केल्या.

logo
marathi.freepressjournal.in