Lok Sabha Elections 2024: नोकरीसाठी मराठी उमेदवार नको, अशी एका कंपनीच्या एचआरने केलेली सोशल मीडिया पोस्ट नुकतीच व्हायरल झाली होती. त्यावरून महाराष्ट्रात बराच गदारोळ होत आहे. अशातच आज राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु असतानाच अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. मराठी "not welcome" म्हणणार्या लोकांना कृपया मत देऊ नका, अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.
आज तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदान सुरु झाले आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातही मतदान होत आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री रेणूका शहाणे यांनी एक खास पोस्ट केली आहे. मराठीला, मराठी माणसांना नको बोलणाऱ्यांना मत देऊ नका अशी विनंती त्यांनी केली आहे. मत न देऊन त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे असं आवाहन त्यांनी केली आहे. एवढंच नाही तर त्यांनी कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरोधात त्या नाहीत पण जे लोक आपल्या महाराष्ट्राचा, त्याच्या संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना योग्य मतदान देऊन उत्तर द्यावे अशी आशा व्यक्त केली आहे.
काय म्हणाल्या रेणूका शहाणे?
सोशल मीडियावर रेणूका लिहतात की, "मराठी "not welcome" म्हणणार्या लोकांना कृपया मत देऊ नका. मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे."
रोहित पवार, वर्षा गायकवाडांनी केली होती टीका
नुकताच एका कंपनीच्या एच आरने जॉब पोस्टमध्ये चक्क मराठी लोकांनी अर्ज करु नयेत अशी जाहिरात करण्याचे धाडस केले. याच वरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपलं मत नोंदवलं होतं. सोमवारी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना, " सध्या गुजराती माणसांचा आत्मविश्वास आणि अहंकार वाढला आहे. कारण त्यांना माहिती आहे की, इथले राजकारणी आपल्या पाठिशी आहेत. सध्या वरुन एक आदेश आला की, महाराष्ट्रातील उद्योग सहज गुजरातला जातात. याच कारणांमुळे गुजराती नेत्यांचा अहंकार वाढला आहे. या सगळ्या गोष्टींमुळे गुजराती कंपन्यांकडून मराठी माणसांना नोकरी नाकारण्याचे प्रकार घडत आहेत. अशा लोकांना मराठी लोकांची ताकद काय असते ते दाखवून द्यावी लागेल." असे ते म्हणाले होते. याशिवाय, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी अशा मुजोर कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची हिम्मत भाजपा-शिंदे सरकारने दाखवावी अशी मागणी केली. असं न केल्यास त्यांना रस्त्यावर उतरून जाब विचारावा लागेल. भाजपाचे सरकार आल्यापासून अशा पद्धतीने मराठीद्वेष उफाळून आला आहे, अशी प्रतिक्रिया या प्रकरणावर दिली होती.