१५ वर्षांचा संसार संपला! आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर विभक्त; मुलीबाबत पोस्टमध्ये काय म्हटलं?

मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर यांनी १५ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर घटस्फोटाची घोषणा केली. सोशल मीडियावरील संयुक्त पोस्टमधून त्यांनी मुलगी जिजाच्या संगोपनाबाबतही महत्त्वाचं वक्तव्य केलं.
१५ वर्षांचा संसार संपला! आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर विभक्त; मुलीबाबत पोस्टमध्ये काय म्हटलं?
Published on

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आदिनाथ कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांनी वैवाहिक आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आहे. आज (दि. १६) सोशल मीडियावर संयुक्त पोस्ट शेअर करत दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होत असल्याची अधिकृत घोषणा केली. तब्बल १५ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

आदिनाथ आणि ऊर्मिलाने त्यांच्या संयुक्त पोस्टमध्ये लिहिले की, "खूप विचार केल्यानंतर आम्ही, आदिनाथ म. कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांनी एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे."

'मुलगी जिजासाठी आम्ही नेहमी एकत्र'

पोस्टमध्ये त्यांनी मुलगी जिजाबद्दलही भावना व्यक्त केल्या आहेत. "जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला, तरी आमची मुलगी जिजा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा यासाठी आम्ही पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचं संगोपन ((Co-parenting)) करू," असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच, एकमेकांबद्दल आणि एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल कायम आदर राहील, असेही दोघांनी स्पष्ट केले.

प्रायव्हसीचा आदर करण्याची विनंती

आदिनाथ आणि ऊर्मिलाने चाहत्यांचे आणि माध्यमांचे आभार मानत त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. "आमच्या या खाजगी प्रवासात मीडिया आणि जनतेने आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा. या विषयावर आमचे हेच एकमेव वक्तव्य असेल आणि यापुढे आम्ही कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही," असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले.

'शुभमंगल सावधान'च्या सेटवर जुळली प्रेमकहाणी

आदिनाथ कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांची पहिली भेट 'शुभमंगल सावधान' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केले होते. दरम्यान आदिनाथ आणि ऊर्मिला यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि २०११ मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले. २०१७ मध्ये त्यांच्या घरी मुलगी जिजाचा जन्म झाला.

गेल्या काही वर्षांपासून या दोघांमध्ये दुरावा असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्या चर्चांवर शिक्कामोर्तब करत आदिनाथ आणि ऊर्मिलाने सोशल मीडियावर संयुक्त पोस्टद्वारे विभक्त होण्याची अधिकृत घोषणा केली.

logo
marathi.freepressjournal.in