विसर्जनानंतर अक्षय कुमार करतोय जुहू चौपाटीवर साफसफाई; म्हणाला, स्वच्छता ही फक्त बीएमसीची जबाबदारी नाही...

७ सप्टेंबर रोजी अक्षय कुमार, अमृता फडणवीस आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मिळून जुहू चौपाटीवरील साफसफाई अभियानात सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात बोलताना अक्षय कुमारने सांगितले की, ज्ञान आपल्याला शिकवते...
विसर्जनानंतर अक्षय कुमार करतोय जुहू चौपाटीवर साफसफाई; म्हणाला, स्वच्छता ही फक्त बीएमसीची जबाबदारी नाही...
Published on

मुंबईसह राज्यभरात दहा दिवसांचा गणेशोत्सव धुमधडाक्यात आणि उत्साहात पार पडला. दहा दिवस बाप्पांची मनापासून सेवा केल्यानंतर राज्यभरातील मंडळांनी ६ सप्टेंबरला त्यांना निरोप दिला. आजही अनेक मोठ्या मंडळांच्या गणपतींचे विसर्जन सुरू आहे.

विसर्जनाच्या वेळी अनेकजण समुद्रातच निर्माल्य टाकतात, तर काही वेळा बाप्पांसाठी केलेली आरासही समुद्रात फेकली जाते. भरतीनंतर किनारा अस्वच्छ होतो आणि ही समस्या दरवर्षी भेडसावत असते. यावर लक्ष देत अनेक संस्था, एनजीओ आणि स्वयंसेवक किनाऱ्याची साफसफाई करतात. यंदा असाच पुढाकार अभिनेता अक्षय कुमार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी, अमृता फडणवीस यांनीही घेतला.

७ सप्टेंबर रोजी अक्षय कुमार, अमृता फडणवीस आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मिळून जुहू चौपाटीवरील साफसफाई अभियानात सहभाग नोंदवला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात अक्षय, अमृता फडणवीस आणि भूषण गगराणी यांच्यासोबत अनेक लोक साफसफाई करताना दिसत आहेत.

या कार्यक्रमात बोलताना अक्षय कुमारने स्वच्छता राखण्यामधील सार्वजनिक जबाबदारीवर भर दिला. IANS शी बोलताना त्याने सांगितले की, ज्ञान आपल्याला शिकवते की स्वच्छता राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्याने पुढे नमूद केले की, पंतप्रधान मोदी देखील यावर भर देतात आणि म्हणतात की स्वच्छता ही फक्त सरकार किंवा बीएमसीची जबाबदारी नाही, तर ती जनतेचीही जबाबदारी आहे.

युजर्सनी केले कौतुक

अक्षय कुमारचा जुहू चौपाटीवर स्वच्छता करताना व्हायरल झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. यावरून चाहत्यांनी आणि युजर्सनी त्याचे कौतुक केले आहे. अनेकांनी लिहिले की, अक्षय नेहमीच चांगले काम करतो. अनेकांनी हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in