"मी मरता मरता वाचले"; मराठी अभिनेता अंशुमन विचारेच्या पत्नीचा धक्कादायक अनुभव

नेहमी सोशल मीडियावर मजा-मस्ती करत असणाऱ्या विचारे कुटुंबासोबत एक दिवस अचानक असं काही घडलं की…
"मी मरता मरता वाचले"; मराठी अभिनेता अंशुमन विचारेच्या पत्नीचा धक्कादायक अनुभव
Published on

नेहमी सोशल मीडियावर मजा-मस्तीचे व्हिडीओ शेअर करणाऱ्या अंशुमन विचारे आणि त्यांच्या पत्नी पल्लवी यांचं कुटुंब सध्या एका गंभीर अनुभवामुळे चर्चेत आहे. अलीकडेच पल्लवी विचारे यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर एक व्लॉग शेअर करत आयुर्वेदिक उपचारादरम्यान घडलेला धक्कादायक प्रसंग उघड केला आहे. "मी मरता मरता वाचले!" अशा शब्दांत सांगितलेला तिचा अनुभव अनेकांना हादरवून सोडणारा ठरत आहे.

"मी मरता मरता वाचले"

पल्लवी यांना हार्मोनल बदलांमुळे काही त्रास होत असल्यामुळे त्यांनी अलोपॅथिक औषधांऐवजी आयुर्वेदिक उपचार घेण्याचा निर्णय घेतला होता. ठाण्यातील एका डॉक्टरकडे त्यांनी प्रथम व्हिजिट केली, ज्यासाठी ३५०० रुपये भरले. त्यानंतर डॉक्टरांनी पंचकर्म उपचारांची शिफारस करत सुमारे ५० ते ६० हजार रुपये घेतले. याच वेळी रक्त तपासणीसाठी पल्लवी यांच्याकडून रक्त घेण्यात आले. मात्र, हे रक्त साध्या सिरींजने नाही तर सतत १० मिनिटे एका कॅप्सूल पॉटमध्ये काढण्यात आले.

पल्लवी यांच्या म्हणण्यानुसार, त्या पॉटमध्ये जवळपास पाऊण कप रक्त साचले होते, आणि त्यावेळी डॉक्टर त्यांच्या शरीरातून किती प्रमाणात रक्त काढले जात आहे हे सांगत नव्हते. यावरून त्यांना शंका आली, म्हणूनच त्यांनी अंशुमनला तातडीने बोलावून घेतले.

त्यादरम्यान पल्लवी बेशुद्ध झाल्या. डॉक्टरांनी त्यांच्या छातीवर दाब देत शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. अंशुमनने याबद्दल डॉक्टरांकडे विचारणा केल्यावर त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की, “रक्त पाहून पल्लवी घाबरली, म्हणून ती बेशुद्ध झाली, काळजी करू नका.” पण दुसरीकडे पल्लवी यांची तब्येत अधिकच खालवत चालली होती. तिला सतत उलट्या होत होत्या. त्या घरी आल्या पण तरीही पूर्ण रात्र त्या अस्वस्थ अवस्थेत होत्या.

दुसऱ्या दिवशी अंशुमन आणि पल्लवीने फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यावेळी तपासणीद्वारे असे समोर आले की, त्यांचे हिमोग्लोबीन ६% इतके झाले होते.. डॉक्टरांच्या मते ५% पेक्षा कमी हिमोग्लोबीन झाले तर हार्ट अटॅक येण्याचा धोका अत्यंत जास्त असतो. सुदैवानं, वेळेवर उपचार मिळाल्यामुळे पल्लवी आता या संकटातून बाहेर आल्या आहेत, असं पल्लवी यांनी सांगितलं.

पल्लवी यांनी या संपूर्ण प्रकाराबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

logo
marathi.freepressjournal.in