ग्लॅमर, यश आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही अध्यात्माशी घट्ट नातं जपणारी जोडी म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. वृंदावनमधील प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांच्या दर्शनासाठी पोहोचले. अध्यात्मिक मार्गावर ठाम विश्वास असलेले हे सेलिब्रिटी कपल यापूर्वीही अनेकदा प्रेमानंद जी महाराजांच्या दरबारात हजेरी लावताना दिसले आहे. यावेळीही त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
गळ्यात तुळशीची माळ; नम्रतेने ऐकले प्रवचन
व्हायरल व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली जमिनीवर बसून, हात जोडत अत्यंत नम्रतेने प्रेमानंद महाराजांचे प्रवचन ऐकत असल्याचे दिसत आहे. दोघेही साध्या वेशात होते. विशेष म्हणजे, अनुष्का आणि विराट दोघांनीही गळ्यात तुळशीची माळ परिधान केली होती. महाराजांचे बोल ऐकताना त्यांच्या चेहऱ्यावर भावूकता स्पष्टपणे जाणवत होती. महाराजांचे बोल ऐकताना अनुष्काच्या डोळ्यांत अश्रूही पाहायला मिळाले.
“आपण आमचे आहात महाराज जी” - अनुष्का
दरबारात प्रेमानंद जी महाराजांनी दोघांनाही ईश्वराशी नातं घट्ट ठेवण्याचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, "आपले कार्य सेवा समजून करा, नेहमी विनम्र राहा आणि कायम नामस्मरण करत राहा.. " प्रवचनानंतर अनुष्काने प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेत भावूक शब्दांत म्हटले, “आपण आमचे आहात महाराज जी आणि आम्ही आपले आहोत.” यावर प्रेमानंद महाराजांनी शांतपणे उत्तर दिले, “आपण सगळेच ईश्वराचे आहोत.” महाराजांच्या या उत्तरानंतर अनुष्का आणि विराट यांनी पुन्हा एकदा आशीर्वाद घेत त्यांचा निरोप घेतला.
चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
जागतिक स्तरावर प्रचंड लोकप्रियता आणि व्यावसायिक यश मिळवूनही विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अध्यात्माकडे वळतात, याबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. त्यांच्या साधेपणाचे, नम्रतेचे आणि भारतीय अध्यात्मिक परंपरेप्रती असलेल्या आदराचे अनेकांनी विशेष उल्लेख केले आहेत.
या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असून, विराट-अनुष्काच्या अध्यात्मिक वाटचालीची पुन्हा एकदा झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे.