

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने दिग्दर्शक म्हणून केलेला पहिलाच शो 'द बॅड्स ऑफ बॉलीवुड' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून, या यशाला आता पुरस्काराचीही मोहोर मिळाली आहे. आर्यन खानला या शोसाठी 'सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शुक्रवारी नवी दिल्लीत झालेल्या एनडीटीव्हीच्या विशेष कार्यक्रमात आर्यनला हा मान देण्यात आला.
पहिलाच पुरस्कार आई गौरी खानला समर्पित
हा पहिलाच दिग्दर्शकीय पुरस्कार आर्यन खानने खास आपल्या आई गौरी खानला समर्पित केला. पुरस्कार स्वीकारताना आर्यन म्हणाला, "हा अवॉर्ड माझ्या आईसाठी आहे. कारण ती मला नेहमी लवकर झोपायला सांगते, कुणाची खिल्ली उडवू नकोस आणि शिवीगाळ करू नकोस, असं शिकवते. पण आज या सगळ्यामुळेच मला हा अवॉर्ड मिळाला आहे," असे तो गमतीत म्हणाला.
आर्यन पुढे म्हणाला, "आता माझ्या आईला माझा खूप अभिमान वाटत असेल आणि ती या जगातली सगळ्यात खुश व्यक्ती असेल." यानंतर त्याने आयोजकांचे आणि संपूर्ण टीमचे आभार मानले.
गौरी खानची भावूक प्रतिक्रिया
हा व्हिडिओ गौरी खानने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत, "मला खरंच तुझा अभिमान वाटतो. मला इतका आनंद दिल्याबद्दल धन्यवाद आर्यन. आता तुझे सगळे अवॉर्ड्स ठेवण्यासाठी एक नवीन कॅबिनेट डिझाइन करते,"अशी प्रेमळ प्रतिक्रिया दिली.
"पप्पांसारखंच मलाही अवॉर्ड्स आवडतात"
या पुरस्कार सोहळ्यात आर्यनने कलाकार, क्रू आणि नेटफ्लिक्सचे विशेष आभार मानत म्हटलं, "पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. हा माझा पहिला पुरस्कार आहे, आणि अजून जिंकायची आशा आहे. माझ्या वडिलांसारखंच मलाही अवॉर्ड्स खूप आवडतात. पण हा अवॉर्ड माझ्या आईसाठी आहे."
हसत तो पुढे म्हणाला, "आज घरी गेल्यावर आईकडून थोडा कमी ओरडा मिळेल."
नेटफ्लिक्सवरील शोला प्रेक्षकांची पसंती
'द बॅड्स ऑफ बॉलीवुड' हा शो याच वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या शोमधून आर्यन खानने दिग्दर्शक म्हणून मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. शोमध्ये राघव जुयाल, लक्ष्य लालवानी, सेहर लांबा, आन्या सिंह यांच्या प्रमुख भूमिका असून, शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान यांसह अनेक बॉलिवूड कलाकारांचे कॅमिओही पाहायला मिळतात. समीक्षकांसह प्रेक्षकांनीही या शोचं भरभरून कौतुक केलं आहे.