१८ वर्षांनी परतली मराठी सिनेसृष्टीतील ‘हिट जोडी’; आता कलर्स मराठीवरील मालिकेत एकत्र!

१८ वर्षांनी मराठी प्रेक्षकांची आवडती जोडी पुन्हा एकत्र! मोठ्या पडद्यावर गाजलेली ही जोडी आता छोट्या पडद्यावर करणार धमाल!
१८ वर्षांनी परतली मराठी सिनेसृष्टीतील ‘हिट जोडी’; आता कलर्स मराठीवरील मालिकेत एकत्र!
Published on

गंमत जंमत’, ‘शेजारी शेजारी’, ‘भुताचा भाऊ’, ‘आमच्यासारखे आम्हीच’ या सारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी अशोक सराफ आणि वर्षा उसगांवकर ही जोडी तब्बल १८–२० वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. या दोघांनी मोठ्या पडद्यावर अनेक गाजलेले चित्रपट दिले आणि आता छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची जादू सादर करण्यास ही अफलातून जोडी सज्ज झाली आहे.

कलर्स मराठीवरील ‘अशोक मामा’ या मालिकेत ३ ऑगस्ट रोजी मंगळागौर विशेष भाग प्रसारित होणार आहे. या खास भागात वर्षा उसगांवकर एका महिलांच्या ग्रुपच्या अध्यक्षा बनून येणार असून, मंगळागौरीच्या पारंपरिक थाटामधील साजशृंगार, झिम्मा-फुगडी, गजरा-नऊवारी अशा रंगतदार वातावरणात त्या सहभागी होणार आहेत. यावेळी त्यांचा खास डान्स परफॉर्मन्सही दिसणार आहे.

या निमित्ताने बोलताना वर्षा उसगांवकर म्हणाल्या, “कलर्स मराठी माझ्यासाठी खूप लकी आहे. बिग बॉस मराठीमधून मी प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि आता 'अशोक मामा'मध्ये काम करत आहे. सर्वात विशेष म्हणजे मी आणि अशोक सराफ पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर एकत्र काम करतोय. आम्ही मोठ्या पडद्यावर एकत्र काम केलं आहेच, पण आता छोट्या पडद्यावरही तो जादू पुन्हा घडवायला उत्सुक आहोत.”

त्यांनी पुढे सांगितलं, “अशोक सराफ हे एक महानट आहेत. त्यांनी अनेक भूमिका केल्या आहेत, अतिशय अनुभवी आहेत. त्यांच्या सोबत प्रत्येक वेळी काम करताना मला काहीतरी नवीन शिकायला मिळतं, आणि खरं तर त्यांच्या सोबत काम करताना मला स्वतःला शोधायला मदत झाली.”

या दोघांना पुन्हा एकत्र पाहणं म्हणजे प्रेक्षकांसाठी एक विशेष ट्रीट ठरणार आहे. ‘अशोक मामा’चा हा मंगळागौर विशेष भाग ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in