

बॉलिवूड आणि म्युझिक इंडस्ट्रीतील लोकप्रिय सिंगर-रॅपर बादशाह याने पंजाबी अभिनेत्री व मॉडेल ईशा रिखीसोबत लग्न केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ आणि फोटोंमुळे या चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या लग्नसोहळ्याची साधी आणि पारंपरिक झलक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
साधेपणात रंगला खास विवाहसोहळा
ईशाची आई पूनम रिखी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघेही लग्नाच्या विधी करताना दिसून येत आहेत. या फोटोंमध्ये होमकुंड, फुलांची सजावट पाहायला मिळत आहे. हा सोहळा घरगुती वातावरणात, केवळ जवळच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडला.
ईशाचा पारंपरिक ब्रायडल लूक चर्चेत
लग्नासाठी ईशाने लाल रंगाचा पारंपरिक सलवार-कमीज परिधान केला होता. सोनेरी नक्षीकाम केलेला ड्रेस, डोक्यावर ओढणी, गळ्यात नेकलेस, मॅचिंग कानातले आणि बिंदी असा लूक तिने केला होता. हातांवरील मेहंदी, ब्रायडल चूडा आणि कलीरामुळे तिचा लूक अधिकच आकर्षक दिसत होता.
बादशाहचा साधा पण स्टायलिश अंदाज
नेहमी स्टेजवर ग्लॅमरस लूकमध्ये दिसणाऱ्या बादशाहने लग्नासाठी कुर्ता-पायजमा, स्टोल आणि पगडी परिधान केली होती. पारंपरिक ब्रोचमुळे त्याचा लूक अधिक उठून दिसत होता.
बादशाहचे दुसरे लग्न
माहितीनुसार, बादशाहचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी २०१२ साली बादशाहने जास्मिन मसीहसोबत लग्न केले होते. मात्र, त्यांचे वैवाहिक आयुष्य फार काळ टिकले नाही आणि २०२० मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर सहा वर्षांनी बादशाहने पुन्हा एकदा आयुष्याची नवी सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, या सगळ्या घडामोडींवर अद्याप बादशाहकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरही लग्नासंदर्भात कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ शेअर केलेले नाहीत. तरीही, समोर आलेल्या लग्नाच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
ईशा रिखी कोण आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, बादशाह आणि ईशा रिखी मागील चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. एका पार्टीत त्यांची ओळख झाली होती. मात्र, त्यांनी आपले नाते प्रकाशझोतातून दूर ठेवले होते. आता समोर आलेल्या लग्नाच्या फोटोंमुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.