'बंधिनी' चित्रपटातून साकारणार स्त्री भावविश्वाची कहाणी; पोस्टर प्रदर्शित, रिलीज डेटही जाहीर

'बंधिनी' हा स्त्रीच्या भावविश्वावर आधारित मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टरचे अनावरण पार पडले असून अश्विनी बागल, भूषण शिवतरे आणि योगेश तनपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
'बंधिनी' चित्रपटातून साकारणार स्त्री भावविश्वाची कहाणी; पोस्टर प्रदर्शित, रिलीज डेटही जाहीर
Published on

मराठी चित्रपटसृष्टीत स्त्रीच्या आयुष्यातील विविध पैलू संवेदनशीलपणे मांडणाऱ्या चित्रपटांची समृद्ध परंपरा आहे. हीच परंपरा पुढे नेणारा 'बंधिनी' हा मराठी चित्रपट येत्या ९ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

एका स्त्रीच्या भावविश्वाची कथा

सत्या फिल्म्स कंपनी प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन सतीश वाघेला यांनी केले असून दिग्दर्शन संतोष मांजरीकर यांनी केले आहे. 'बंधिनी'ची कथा देविका या मध्यवर्ती पात्राभोवती फिरते. प्रेम, त्याग, कर्तव्य, कुटुंब आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत एका स्त्रीच्या भावनिक प्रवासाचे चित्रण या चित्रपटातून करण्यात आले आहे. ही केवळ एका महिलेच्या संघर्षाची कथा नसून प्रत्येक नात्यातील प्रेम, त्याग आणि आत्मसन्मानाचा अर्थ नव्याने उलगडणारी भावनिक सफर असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे.

प्रमुख भूमिकेत हे कलाकार

चित्रपटात अश्विनी बागल, भूषण शिवतरे आणि योगेश तनपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबत प्रसाद सुर्वे, अविनाश किर्ती, मिलिंद संगावार, धीरज बिडवे, मनोज चौधरी, गोरक्ष लोखंडे, आदित्य साळुंखे, रोहित भिंगारे, प्रताप कोलते, शीतल पाटील, शीतल ओसवाल, रश्मी व्यहारे आणि आरती पवार हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

'बंधिनी'चे संगीत रोहन पगारे यांनी दिले असून संगीत संयोजन प्रशांत शांताराम नांदगावकर यांचे आहे. तर कविता कृष्णमूर्ती, राहुल देशपांडे, वैशाली सामंत आणि देविका पणशीकर यांच्या सुरेल आवाजात चित्रपटातील गाणी सादर करण्यात आली आहेत.

चित्रपटाबद्दल बोलताना निर्माता सतीश वाघेला यांनी या चित्रपटाचा विषय आणि मांडणी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास व्यक्त केला.

'अनेक महिलांना स्वतःचं प्रतिबिंब दिसेल' – संतोष मांजरीकर

दिग्दर्शक संतोष मांजरीकर म्हणाले, "आजच्या काळात प्रत्येक स्त्री स्वतःची स्वप्ने आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करत असते. 'बंधिनी' ही अशाच एका स्त्रीची कथा आहे, जी अनेक महिलांच्या आयुष्याशी जोडली जाईल. प्रेक्षकांना विचार करायला लावणारा आणि मनाला स्पर्श करणारा चित्रपट देण्याचा आमचा प्रयत्न आहे."

logo
marathi.freepressjournal.in