बिग बॉस मराठीचा सहावा सिझन सध्या चांगलाच रंगात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या भागात रोशन भजनकर घराबाहेर पडल्यानंतर खेळात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. कारण घरात एक नव्हे, तर तब्बल तीन वाइल्ड कार्ड एंट्रीज् झाल्या आणि एंट्री होताच वातावरण तापलं.
अभिनेता संकेत पाठक, संस्कृती साळुंके आणि रेवा कौरासे या तिघांनी बिग बॉसच्या घरात पाऊल टाकताच जुन्या सदस्यांची समीकरणं ढासळू लागली आहेत. या तिघांच्या आगमनानंतर प्रेक्षकांमध्येही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
अभिनेत्री रेवा कौरासेने हिंदी मालिकांमधून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तर अभिनेता संकेत पाठक 'दुहेरी', 'लग्नाची बेडी' या सारख्या मालिकांमुळे घराघरात पोहोचला. संस्कृती साळुंकेने विविध रिॲलिटी शोमधून आपली वेगळी छाप पाडली आहे. आता हे तिघेही बिग बॉस मराठीच्या घरात स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
एंट्री होताच पंगा!
घरात येताच रेवाने थेट रुचिताशीच पंगा घेतल्याचं पाहायला मिळालं. समोर आलेल्या नव्या व्हिडिओमध्ये रेवा आणि रुचिता आमनेसामने येताना दिसत आहेत. रेवा रुचिताला म्हणताना दिसते, "बाहेर लोकांचं असं झालंय की रुचिताला बंद करा यार… आवाज नाही ऐकायचाय हिचा…" यावर रुचिताही मागे हटत नाही. "मी तुला काही विचारलं नाहीये. आली मोठी शहाणी," असं ती प्रत्युत्तर देते.
रेवा पुढे म्हणते, "हे सगळं करून तू छान दिसत नाहीयेस." त्यावर रुचिताचा संताप अनावर होतो. "मी छान दिसतेय, वाईट दिसतेय.. मला याच्याशी काही घेणं देणं नाहीये," असं ती ठणकावते. त्यानंतर रेवा तिचा हात धरून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताच रुचिता आणखी भडकते आणि "डोन्ट टच मी, डोन्ट टच मी… गेट लॉस्ट," असं स्पष्ट शब्दांत सांगते.
आता गेम पालटणार?
तीन वाइल्ड कार्ड एंट्रींनंतर घरातील समीकरणं पुन्हा एकदा बदलताना दिसत आहेत. आधीच तुटलेल्या टोळीमध्ये फूट पडलेली असताना नवे सदस्य त्याचा फायदा घेतील का? की जुन्या सदस्यांना एकत्र येण्याची वेळ येईल? आता पुढील काही दिवसांत बिग बॉसच्या घरातील खेळ कोणत्या दिशेने वळतो, हे पाहणं रंजक ठरणार आहे.