पहिलाच चित्रपट अन् थेट नॅशनल अवॉर्डला गवसणी! लहानग्या भार्गव जगतापची झळाळती कामगिरी

मराठी सिनेसृष्टीतील नवा उगवता तारा भार्गव रत्नकांत जगताप याने पहिल्याच चित्रपटातून प्रचंड यश मिळवत राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार दोन्ही आपल्या नावावर केले आहेत. ‘नवशक्ति’ला दिलेल्या खास मुलाखतीत भार्गवने आपल्या प्रवासाचे अनुभव शेअर केले आहेत.
पहिलाच चित्रपट अन् थेट नॅशनल अवॉर्डला गवसणी! लहानग्या भार्गव जगतापची झळाळती कामगिरी
Published on

मराठी सिनेसृष्टीतील नवा उगवता तारा भार्गव रत्नकांत जगताप याने पहिल्याच चित्रपटातून प्रचंड यश मिळवत राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार दोन्ही आपल्या नावावर केले आहेत. ‘नाळ २’ या चित्रपटातील त्याच्या अप्रतिम अभिनयाने केवळ मराठी प्रेक्षकांचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. इतकेच नव्हे तर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सुद्धा या छोट्या कलाकाराचा फॅन झाला असून दिल्लीतील नॅशनल अवॉर्ड सोहळ्यात दोघांची भेट विशेष ठरली. शाहरुखसोबतचे भार्गवचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

फक्त १२ वर्षांच्या भार्गवने पहिल्याच चित्रपटासाठी कॅमेऱ्यासमोर सहजतेने केलेला अभिनय सर्वांना थक्क करणारा ठरला. ‘नवशक्ति’ला दिलेल्या खास मुलाखतीत भार्गवने आपल्या प्रवासाचे अनुभव शेअर केले आहेत. ‘नाळ २’चे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांनी सेटवरच त्याला अभिनयाचे धडे दिले आणि भार्गवने ते मनापासून आत्मसात केले. शूटिंगदरम्यान सहकलाकारांसोबत घालवलेले क्षण, भावनिक दृश्यांतील नैसर्गिक अभिनय यामुळेच त्याने प्रेक्षकांची मने जिंकली.

आता भार्गवचा पुढचा मोठा प्रोजेक्ट महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय २’ आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाप्रमाणेच आगामी चित्रपटाचीही मोठी उत्सुकता असून भार्गवचे काम प्रेक्षकांना पुन्हा मोहून टाकेल, अशी अपेक्षा आहे.

छोट्या वयात राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेल्या या मराठमोळ्या बालकलाकाराने पुढे बॉलिवूडमध्येही काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गणपती बाप्पावर असलेली अढळ श्रद्धा आणि कलेबद्दलची ओढ यामुळे भार्गवचा हा प्रवास निश्चितच आणखी झळाळता होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in