
लबूबू बाहुली ही गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर आणि सेलिब्रिटींमध्ये लोकप्रिय झाली आहे. अनन्या पांडे, उर्वशी रौतेला यांसारख्या अभिनेत्रींपासून ते अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांपर्यंत या बाहुलीचं आकर्षण दिसून आलं. अभिनेत्री भारती सिंगनेही ही बाहुली आपल्या मुलासाठी 'गोला'साठी खूप आनंदाने खरेदी केली होती. मात्र, तिने हि बाहुली चक्क जाळून टाकली आहे. यामागे तिने आपला मुलगा बाहुली आल्यापासून बिघडत चालला आहे असे कारण दिले आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून हे दृश्य पाहून अनेक चाहते चक्रावले आहेत.
अलीकडेच, भारती सिंगने तिचा लेटेस्ट व्लॉग शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या मुलाची आवडती लबूबू बाहुली जाळताना दिसत आहे. भारती सिंग म्हणते की जेव्हापासून ही बाहुली तिच्या घरी आली आहे, तेव्हापासून तिच्या मुलाचे वागणे खूप बदलले आहे. ती म्हणते की तिचा मुलगा खोडकर कृत्ये करू लागला आहे. यानंतर ती लबूबू बाहुली जाळते. भारती या व्हिडीओमध्ये घाबरलेली दिसत आहे. पण, तिचा पती हर्ष लिंबाचिया तिच्या या कृत्याबद्दल आश्चर्यचकित झालेला दिसत आहे.
लबूबू बाहुली आल्यानंतर मुलगा खोडकर झाला
१७.२८ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये भारतीने असे का केले हे देखील सांगितले आहे. ती सांगते, की जेव्हापासून तिच्या मुलाला लबूबू बाहुली मिळाली तेव्हापासून तो खूप खोडकर झाला आहे, ज्यामुळे ती ही बाहुली जाळत आहे. भारतीचा असा विश्वास आहे, की ही लबूबू बाहुली आहे, जी तिच्या मुलाच्या मनात खोडकरपणा निर्माण करते. यासोबतच ती असेही म्हणते, की लबूबू बाहुली राक्षसी आहे आणि ती जाळल्यानंतर तिच्या मुलाचा खोडकरपणा संपेल.
भारती म्हणते, ''तिच्या मैत्रिणी तिला ती अंधश्रद्धाळू झाल्याचे सांगतात. पण, आम्ही जेव्हापासून ही लबूबू बाहुली आणली आहे, तेव्हापासून जास्मिन, माझी बहीण, सगळे म्हणत आहेत, की ही बाहुली सैतानाचे रूप आहे. मी माझ्या बाळाच्या रक्षणासाठी काहीही करेन.'' बाहुली जाळल्यावर भारती म्हणते, ''सैतान मेला आहे, सैतान हरला आहे आणि देव नेहमीच जिंकतो. वाईट हरले आहे आणि सत्य जिंकले आहे.''
या व्हिडीओने केवळ प्रेक्षकच नव्हे, तर भारती सिंगचे चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात लबूबू बाहुली प्रचंड प्रसिद्ध झाली आहे. ही बाहुली चीनमधील एका कलाकाराने डिझाइन केली असून, तिची लोकप्रियता जगभर वाढली आहे.
मार्केटमध्ये ही बाहुली खरेदी करणे तितकेसे सोपे नाही. ग्राहकांना यासाठी आधीच बुकिंग करावे लागते, कारण कंपनीच्या मते ही एक लिमिटेड एडिशन बाहुली आहे जी केवळ विशिष्ट कालावधीतच विक्रीसाठी उपलब्ध केली जाते. म्हणूनच या छोट्याशा बाहुलीसाठी हजारोंची किंमत मोजावी लागते, आणि तरीही बाजारात ती मिळवण्यासाठी तरुणाईमध्ये प्रचंड उत्सुकता आणि धडपड पाहायला मिळते.