

‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून फिनालेसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रत्येक स्पर्धक फिनालेत पोहोचण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसतोय. अशातच या आठवड्यातील नॉमिनेशन टास्कमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला.
नेमकं काय घडलं?
या टास्कमध्ये स्पर्धकांना ज्या सदस्याला फिनालेत जाऊ द्यायचं नाही, त्याचा ‘टीव्ही’ फोडायचा होता. यावेळी राकेश बापटने विशाल कोटियनचं नाव घेत, “तो सतत इतरांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलतो,” असं कारण दिलं. हे ऐकताच विशाल संतापला आणि त्याने लगेचच यावर आक्षेप घेतला. “मी तुझ्याबद्दल काय पर्सनल बोललो आहे, ते सांग,” असा सवाल त्याने केला.
यानंतर राकेशने आधीच्या एका प्रसंगाचा उल्लेख करत सांगितलं की, विशालने तन्वीसमोर “मालाड स्टेशनवर राकेशसारखे बरेच जण मिळतील, त्याला एवढं मोठं का मानता?” असं वक्तव्य केलं होतं, जे त्याला वैयक्तिक वाटलं. यावर विशालने पलटवार करत, “ही गोष्ट पर्सनल कशी? तू माझ्या वयाबद्दल प्राजक्ताशी बोललास, ते पर्सनल नाही का?” असा सवाल केला.
वाद हळूहळू चिघळत गेला आणि रागाच्या भरात विशालने राकेशच्या घटस्फोटाचा मुद्दा काढत टोमणा मारला. “तुझा डिव्होर्स का झाला,” असं म्हणत त्याने मर्यादा ओलांडली. हे ऐकताच वातावरण अधिकच तणावपूर्ण झालं. यावर “तू माझा डिव्होर्स कशाला काढतोय,” असा जाब विचारत राकेश भडकला. काही क्षणातच शाब्दिक वाद धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला. विशालने राकेशला धक्का दिल्यानंतर राकेशनेही प्रतिकार केला आणि दोघं एकमेकांच्या अंगावर धावून गेले.
घरातील इतर सदस्यांनी मध्यस्थी करत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने बिग बॉसला हस्तक्षेप करावा लागला. राकेशला गार्डन एरियात, तर विशालला बेडरूममध्ये नेण्याचे आदेश देण्यात आले.
या संपूर्ण प्रकारानंतर बिग बॉसने दोघांवर कठोर कारवाई केली. राकेशला या आठवड्यासाठी थेट नॉमिनेट करून कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर काढण्यात आलं. तर विशालला संपूर्ण सिझनसाठी नॉमिनेट करण्यात आलं असून, त्याचं कॅप्टन्सी पद आणि ‘टिकिट टू फिनाले’ची संधीही हिरावून घेण्यात आली आहे.
‘एक किलो बदाम पाठवते!’ – बहिणीचा टोला
या वादानंतर राकेशची बहीण शीतल बापट हिने सोशल मीडियावरून विशालला टोला लगावला. “विशाल, एक किलो बदाम पाठवते. मेमरी लॉस होतोय तुला, रोज खा जरा!” अशा शब्दांत तिने प्रतिक्रिया दिली.
विशालने वयावरून बोलणं ‘पर्सनल’ असल्याचं म्हणत वाद घातला होता. मात्र, त्याचाच जुना व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात तो स्वतः इतरांच्या वैयक्तिक गोष्टींवर बोलताना दिसतोय. यावरून शीतलने त्याला अप्रत्यक्षपणे आरसा दाखवला.
मेघा धाडेचा संताप
‘बिग बॉस मराठी’ची माजी विजेती मेघा धाडे हिनेही या प्रकरणावर स्पष्ट भूमिका घेतली आहे. तिने विशालवर जोरदार टीका करत त्याला ‘ढोंगी’ म्हटलं.
“तू इतरांच्या वयावर बोलतोस ते चालतं, आणि तुझ्यावर बोललं की पर्सनल होतं? स्वतः २५ वर्षांनी लहान मुलीला पटवायला जातोस, तेव्हा चालतं का?” अशा शब्दांत मेघाने विशालला सुनावलं.
पुन्हा रंगणार नवा वाद – राकेश विरुद्ध राखी
दरम्यान, आता नव्या प्रोमोमध्ये राकेश बापट आणि राखी सावंत यांच्यातील वाद अधिकच तीव्र होताना दिसतो. सुरुवातीलाच राकेश संतापून “फालतुगिरी आहे” असं म्हणताना दिसतो. त्यावर राखी, “मला जबरदस्तीने आणलं,” असं म्हणते. यावर राकेश तिला उलट सवाल करत, “तू बाळ आहेस का, जबरदस्तीने आणायला?” असं सुनावतो.
यानंतर वाद आणखी चिघळतो. राकेश राखीला “मूर्ख बाई” म्हणतो, तर राखी त्याला “बधिर” म्हणत प्रत्युत्तर देते. पुढे राखी, “तू मुलींना हत्यार बनवतोस,” असा आरोप करते. हे ऐकताच राकेशचा संताप अनावर होतो आणि तो, “तुझ्या जिभेला हाड नाही का गं?” असं म्हणत पुन्हा तिच्यावर भडकतो.
या जोरदार वादानंतर आता आजच्या भागात नेमकं काय घडणार, हा वाद किती वाढणार आणि बिग बॉस यावर काय भूमिका घेणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.