'रुचिता हे डिझर्व्ह नव्हती करत'! बिग बॉस मराठी ६ मधील एलिमिनेशनवर चाहत्यांची नाराजी

‘बिग बॉस मराठी ६’च्या घरातून रुचिता जामदारच्या एलिमिनेशनने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. तिचे अचानक झालेले एलिमिनेशन अन्यायकारक असल्याचा आरोप करत अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.
'रुचिता हे डिझर्व्ह नव्हती करत'! बिग बॉस मराठी ६ मधील एलिमिनेशनवर चाहत्यांची नाराजी
'रुचिता हे डिझर्व्ह नव्हती करत'! बिग बॉस मराठी ६ मधील एलिमिनेशनवर चाहत्यांची नाराजी
Published on

'बिग बॉस मराठी ६'च्या घरात शनिवारी झालेल्या एलिमिनेशनने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. आठव्या आठवड्यात झालेल्या या एलिमिनेशनमध्ये रुचिता जामदारला घराबाहेर जावे लागले. घरात सतत वाद, भांडणं, आरडा-ओरडा आणि भावनिक प्रसंगांमुळे चर्चेत राहणारी रुचिता ही शोमधील सर्वात चर्चित स्पर्धकांपैकी एक होती. त्यामुळे तिचे अचानक झालेले एलिमिनेशन अनेकांसाठी अनपेक्षित आणि धक्कादायक ठरले. तिच्या बाहेर पडण्यावर आता सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

भाऊच्या धक्क्यावर एलिमिनेशन

शनिवारी (दि. ७)'भाऊचा धक्का’च्या भागात सागर करंडे, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, तन्वी कोलते आणि वाइल्ड कार्ड स्पर्धक संस्कृती साळुंके यांना सेफ घोषित करण्यात आले. तर रुचिता जामदारला घराबाहेर जावे लागले. तिच्या एलिमिनेशनने अनेक चाहत्यांना धक्का बसला असून सोशल मीडियावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

रेडिटवरील एका चर्चेत काही प्रेक्षकांनी असा आरोप केला की, रुचिताला प्रेक्षकांच्या मतांवर नव्हे तर इतर कारणांमुळे बाहेर काढण्यात आले. एका युजरने लिहिले की, "निर्मात्यांना वाटले की रुचिताला बाहेर काढल्याने प्रेक्षक खुश होतील, पण उलट लोक आता शोवर नाराज आहेत."

तर आणखी एका युजरने "रुचिता हे डिझर्व्ह नव्हती करत ," असे म्हणत तिच्या एलिमिनेशनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काहींनी असा दावा केला की, इतर स्पर्धकांच्या तुलनेत रुचिता अधिक सक्रिय होती आणि तिच्या बाहेर जाण्यामुळे शोची रंगत कमी झाली आहे.

इतर स्पर्धकांवरही प्रश्न

काही प्रेक्षकांनी दीपाली आणि प्रभू यांच्याबद्दलही प्रतिक्रिया देत ते घरात टिकण्यास कमी पात्र असल्याचा दावा केला. त्यामुळे रुचिताला बाहेर काढण्याचा निर्णय योग्य होता का, असा सवालही सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.

रुचिताची प्रतिक्रिया

घरातून बाहेर पडल्यानंतर रुचिताने, " बिग बॉसच्या या घरात प्रत्येक गोष्ट मी मनापासून केली आणि खूप वेळा नॉमिनेट झाले तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांनी मला या खेळात लढायला बळ दिलं. मी घरात ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील त्या बद्दल तुमची मनापासून माफी मागते. हे एविक्शन माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे, पण जनतेचा निर्णय मला मनापासून मान्य आहे. माझ्या या प्रवासात माझी साथ दिल्या बद्दल खूप खूप आभार !", अशी प्रतिक्रिया दिली.

पुढील आठवड्यात नवे वळण?

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ६’च्या नवव्या आठवड्यात नवे वळण येण्याची शक्यता आहे. राखी सावंत कॅप्टन झाल्याने घरातील समीकरणे बदलणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in