

'बिग बॉस मराठी'चा सहावा सिझन आता चांगलाच रंगात येताना दिसत असून, घरातील पहिल्या नॉमिनेशन टास्कने स्पर्धेला वेग दिला आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सागर कारंडे आणि तन्वी कोलते यांच्यात टोकाचे वाद झाल्याचं दिसून येत असून, या वादामुळे घरातील वातावरण चांगलंच तापलं आहे.
"सागर कारंडे या शोसाठी अपात्र"
प्रोमोमध्ये पाहायला मिळतं की, पहिल्या नॉमिनेशन टास्कदरम्यान तन्वीने सागर कारंडेचा फोटो असलेली पतंग कापली. यावेळी तिने, "सागर कारंडे या शोसाठी अपात्र आहेत," असं विधान केलं. तन्वीच्या या वक्तव्यामुळे सागर संतप्त झालेला दिसून आला.
"एवढी तर अक्कल पाहिजे!"
तन्वीच्या आरोपांना उत्तर देताना सागर म्हणाला, "एवढी तर अक्कल पाहिजे की आपण काय बोलतोय!" यावर तन्वीनेही माघार न घेता "मी नॉनसेन्स आहे, तुम्ही बोलायची गरज नाही" असं असं प्रत्युत्तर दिलं. वादाच्या दरम्यान सागरने, "मी तुला आधीच म्हटले होते मी बोलताना मध्ये बोलायचे नाही" असे म्हणत मध्ये न बोलण्याचा इशारा दिला. यावर तन्वीने "मी तुझ्या आवाजाला घाबरत नाही, तू मला शिकवणार" असं उत्तर दिलं आहे.
नॉमिनेशन टास्कचा घरावर परिणाम?
पहिल्याच नॉमिनेशन टास्कमध्ये झालेल्या या वादामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण झालं आहे. सदस्यांमधील मतभेद आता हळूहळू समोर येताना दिसत असून, पुढील काळात घरातील समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान, नॉमिनेशनच्या भीतीपोटी सागर आणि तन्वी एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत का?असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे. आज रात्री ८:०० वाजता याचं उत्तर मिळण्याची शक्यता आहे.