

'बिग बॉस मराठी ६' आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, घरातील प्रत्येक क्षण निर्णायक ठरत आहे. विजेतेपदाची शर्यत रंगात आली असताना स्पर्धकांमध्ये तणाव, रणनीती आणि भावनांचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. अशातच पहिली फायनलिस्ट ठरलेली तन्वी कोलते एका वक्तव्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
सीझनच्या सुरुवातीपासून तन्वी कोलतेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. तिचा शांत स्वभाव, खेळाकडे पाहण्याची पद्धत, टास्कमधील कामगिरी आणि जिंकण्याची जिद्द यामुळे ती विजेतेपदाची मजबूत दावेदार मानली जात होती. अनेक सोशल मीडिया पेजेसवरही तिच्याच नावाची चर्चा रंगत होती. मात्र, नुकत्याच झालेल्या एका प्रसंगानंतर समीकरणं बदलताना दिसत आहेत.
गेल्या आठवड्यात शेवटच्या 'भाऊच्या धक्क्या'वर मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या राखी सावंतचा प्रवास अचानक संपला आणि तिला घराबाहेर जावं लागलं. या एलिमिनेशनमुळे घरातील वातावरण आधीच ढवळून निघालं होतं. यानंतर होस्ट रितेश देशमुखने मिड-वीक एव्हिक्शन जाहीर करत आणखी एक धक्का दिला. या निर्णयामुळे स्पर्धकांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
रेवा कौरासे घराबाहेर; तन्वी भावूक
मिड-वीक एव्हिक्शनमध्ये मंगळवारी, (दि. १४) वाईल्ड कार्ड स्पर्धक रेवा कौरासे हिला घराबाहेर जावं लागलं. रेवाच्या जाण्याने घरातील अनेक सदस्य भावूक झाले. तन्वी कोलतेलाही हा क्षण पचवणं कठीण गेलं.
रेवा बाहेर पडताना तन्वीने भावना व्यक्त करत म्हटलं, "तुझ्यासाठी मला दोन शब्द बोलायचे आहेत… बिग बॉसच्या घरात आली एक बाहुली. ती लेट आली पण, थेट मनात भरली! टास्क ती एकदम जबरदस्त खेळली… माझ्याबरोबर पडली, उठली, रडली आणि हसली… पण या आठवड्यात ती मला सोडून चालली. आज खोटारडेपणा आणि धक्काबुक्की इथे राहिली… आणि माझ्या चांगल्या मनाची पोरगी थेट घरातून बाहेर चालली."
अनुश्री मानेचं प्रत्युत्तर; घरात वाद
तन्वीच्या या वक्तव्यामुळे घरातील वातावरण अचानक बदललं. तिच्या बोलण्यातून इतर स्पर्धकांवर अप्रत्यक्ष टीका केल्याचं अनेकांना वाटलं. यावर अनुश्री मानेने लगेचच प्रतिक्रिया देत म्हटलं, "आमचं मन नाहीये चांगलं बरं का… आम्ही मनातूनच घाण आहे. काहीही बोलते… माणूस घरातून चाललाय तरी हिचं वेगळंच सुरूये."
सोशल मीडियावर तन्वी ट्रोल
या प्रसंगानंतर सोशल मीडियावर तन्वी कोलतेविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या. आतापर्यंत विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जाणारी तन्वी एका वक्तव्यामुळे ट्रोल होताना दिसली. अनेकांनी तिच्यावर नाराजी व्यक्त करत तिला मत न देण्याचं आवाहन केलं. काही नेटकऱ्यांनी "तन्वी फेक आहे", "तन्वीला घराबाहेर काढा", "महाराष्ट्राला तन्वी नको" अशा तीव्र प्रतिक्रिया दिल्या. तर काहींनी तन्वीच्या बोलण्याचं समर्थन करत तिच्याच विजयासाठी प्रार्थना करत असल्याचंही म्हटलं.
तर काही प्रेक्षकांनी अनुश्री माने, विशाल आणि राकेश बापट यांना पाठिंबा दर्शवला. "अनुश्री आणि विशाल एकटे खेळत आहेत", "विशाल स्ट्राँग प्लेयर आहे", अशा कमेंट्सही पाहायला मिळाल्या. अंतिम टप्प्यात तन्वीने स्वतःची प्रतिमा खराब केली का, अशी चर्चा रंगली आहे.
ग्रँड फिनालेकडे सगळ्यांचं लक्ष
आता १९ एप्रिल रोजी होणाऱ्या ग्रँड फिनालेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रेक्षकांचा अंतिम कौल कोणाला मिळणार आणि ‘बिग बॉस मराठी ६’ची ट्रॉफी कोण उचलणार, याकडे सर्वांची उत्सुकता लागून राहिली आहे.