

मराठी मनोरंजनविश्वात गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला ‘बिग बॉस मराठी ६’ अखेर आज (दि.१९) ग्रँड फिनालेसह संपला. प्रचंड उत्सुकतेच्या वातावरणात पार पडलेल्या अंतिम सोहळ्यात तन्वी कोलतेने विजेतेपद पटकावत बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली.
शेवटच्या क्षणापर्यंत रंगली लढत
संपूर्ण सीझनभर तन्वी कोलतेने शांत, ठाम आणि दमदार खेळ सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली होती. तरीही सोशल मीडियावर राकेश बापट विजेता ठरेल, असे अनेक अंदाज व्यक्त होत होते. मात्र अंतिम निकालात तन्वीने बाजी मारत ट्रॉफी आपल्या नावावर केली, तर राकेश बापट उपविजेता ठरला.
ग्रँड फिनालेत रंगला जल्लोष
ग्रँड फिनालेचा सोहळा अत्यंत रंगतदार झाला. होस्ट रितेश देशमुखने आपल्या खास शैलीत सूत्रसंचालन करत कार्यक्रमाला वेगळाच रंग दिला. टॉप ५ स्पर्धकांनी सादर केलेल्या डान्स परफॉर्मन्सने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या विशेष सोहळ्यात जेनेलिया देशमुख आणि अभिषेक बच्चन यांच्या उपस्थितीने फिनाले अधिक आकर्षक ठरला.
अंतिम टप्प्यात दीपाली सय्यद सर्वप्रथम बाहेर पडली. त्यानंतर अनुश्री माने आणि विशाल कोटियन यांचा प्रवास संपला. अखेरीस तन्वी कोलते आणि राकेश बापट यांच्यात अंतिम सामना रंगला.
३ महिन्यांचा प्रवास संपला
या सीझनमध्ये एकूण १७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर ४ वाइल्ड कार्ड स्पर्धक सहभागी झाले. मागील तीन महिन्यांत टास्क, वाद, मैत्री आणि भावनिक क्षणांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. अखेर या प्रवासाचा शेवट तन्वीच्या विजयाने झाला.
बक्षीस रक्कम किती?
तन्वी कोलतेला विजेतेपदासोबत तब्बल १५ लाख रुपये बक्षीस रक्कम देण्यात आली. यासह ‘बिग बॉस मराठी ६’ची चमचमती ट्रॉफीही तिने पटकावली. संपूर्ण सीझनभर सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या तन्वी कोलतेने शेवटी विजेतेपद मिळवत स्वतःची छाप उमटवली.