'पान मसाला' जाहिरातीवरून सलमान खानला नोटीस; भाजप नेत्याने दाखल केली तक्रार

केशरचा दर प्रति किलो ४ लाख रुपये आहे, मग ५ रुपयांच्या पाकिटात केशर कसं असणार?...
'पान मसाला' जाहिरातीवरून सलमान खानला नोटीस; भाजप नेत्याने दाखल केली तक्रार
Published on

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. पण, यावेळी त्याच्या चित्रपटासाठी नाही, तर ‘पान मसाला’ जाहिरातीसाठी. राजस्थानमधील भाजप नेते आणि उच्च न्यायालयाचे वकील इंदर मोहन सिंग हनी यांनी सलमानविरुद्ध कोटा ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत सलमान खान आणि 'राजश्री पान मसाला' ब्रँडवर दिशाभूल करणारी जाहिरात केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

तक्रारकर्त्याचा आरोप आहे की सलमान खान आणि राजश्री ब्रँडने त्यांच्या उत्पादनाला 'केशरयुक्त वेलची' आणि 'केशरयुक्त पान मसाला' म्हणून सादर केले, जे प्रत्यक्षात शक्य नाही. "केशरचा दर प्रति किलो ४ लाख रुपये आहे, मग ५ रुपयांच्या पाकिटात केशर कसं असणार?" असा सवाल हनी यांनी केला आहे.

आरोग्याचा मुद्दा पुढे

इंदर मोहन सिंग हनी यांनी सांगितले की, "पान मसाल्याचे सेवन तोंडाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. तरीही आपल्या देशात सेलिब्रिटी लोक या उत्पादनांची जाहिरात करतात. सलमानसारख्या आदर्श व्यक्तींनी युवकांना चुकीचा संदेश देऊ नये," असेही ते म्हणाले. या तक्रारीनंतर कोटा ग्राहक न्यायालयाने सलमान खान आणि संबंधित कंपनीला नोटीस बजावली असून, पुढील सुनावणी २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

महत्त्वाची ठरणार पुढील सुनावणी

माहितीनुसार, सलमान खानने 'राजश्री इलायची' (वेलची) या उत्पादनाच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे, मात्र तो 'राजश्री पान मसाला'च्या कोणत्याही जाहिरातीत दिसलेला नाही. त्यामुळे प्रकरणाची दिशा पुढील सुनावणीतच स्पष्ट होईल. या प्रकरणात सलमानने अजून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाहीये.

दरम्यान, सलमान सध्या ‘बिग बॉस १९’चा सूत्रसंचालक म्हणून झळकत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला त्याचा चित्रपट सिकंदर फारसा चालला नाही, मात्र पुढील ‘बॅटल ऑफ गलवान’बाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

logo
marathi.freepressjournal.in