Dharmendra Death: बॉलिवूडचा 'ही-मॅन' धर्मेंद्र यांचे निधन, सनी देओलकडून मुखाग्नी; मनोरंजन विश्वात शोककळा

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची आज (दि.२४) प्राणज्योत मालवली. ते ८९ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.
Dharmendra Death: बॉलिवूडचा 'ही-मॅन' धर्मेंद्र यांचे निधन, सनी देओलकडून मुखाग्नी; मनोरंजन विश्वात शोककळा
Published on

आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेले बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची आज (दि.२४) प्राणज्योत मालवली. ते ८९ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली जुहू येथील राहत्या घरी उपचार सुरु होते. पण, अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांचे निधन होताच, अर्ध्या तासातच त्यांच्यावर विले पार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मोठा मुलगा अभिनेता सनी देओलकडून त्यांना मुखाग्नी देण्यात आला. धर्मेंद्र यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात तसेच त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

दोन आठवड्यांपूर्वी धर्मेंद्र यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून होती. त्यांचे चाहते त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत होते. त्यावेळी त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती. पण, आज मात्र बॉलीवूडचा 'ही-मॅन' अनंतात विलीन झाला आहे.

साधी जीवनशैली, नम्रता आणि मनमिळाऊ स्वभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, "भारतीय सिनेमाच्या एका सुवर्णयुगाचा अंत धर्मेंद्रजींच्या निधनाने झाला आहे. ते केवळ एक दिग्गज चित्रपट व्यक्तिमत्त्व नव्हते, तर प्रत्येक भूमिकेला आपली वेगळी ओळख देणारे, विलक्षण प्रतिभावान अभिनेते होते. त्यांनी साकारलेल्या विविध भूमिका प्रेक्षकांच्या मनाला नेहमीच भावल्या." पुढे ते म्हणाले, "धर्मेंद्रजींची साधी जीवनशैली, नम्रता आणि मनमिळाऊ स्वभाव यासाठीही ते तितकेच आदरणीय होते. या दुःखद प्रसंगी माझ्या भावना त्यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि असंख्य चाहत्यांसोबत आहेत. ॐ शांती."

भारतीय सिनेमाचे खरे दिग्गज

दिग्दर्शक करण जोहर याने धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती देत एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. त्यात त्याने म्हटले की, एका युगाचा अंत… एक महान, प्रचंड लोकप्रिय मेगास्टार… ते होते आणि कायम राहतील भारतीय सिनेमाचे खरे दिग्गज… आज आपल्या क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे… अशी जागा जी कुणीच भरू शकत नाही…कारण धरमजी हे एकच होते…तुमची खूप आठवण येईल…तुमच्यासोबत काम करण्याचं भाग्य लाभलं, हा माझ्यासाठी नेहमीच आशीर्वाद असेल… आणि माझं मन अत्यंत प्रेमाने, आदराने आणि कृतज्ञतेने फक्त एवढंच म्हणतं, 'अभी ना जाओ छोड़कर… के दिल अभी भरा नहीं', ॐ शांती."

धर्मेंद्र यांची संक्षिप्त कारकीर्द

धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ मध्ये झाला होता. त्यांनी १९६० मध्ये अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. २०११ पर्यंत त्यांनी २४७ चित्रपटांमधून भूमिका साकारल्या. वैविध्यपूर्ण भूमिका साकारुन सिनेसृष्टीत त्यांच्या अभिनयाची छाप पाडली. 'शोले' सिनेमातील त्यांची भूमिका, हेमा मालिनी आणि त्यांची जोडी तसेच जय-वीरूची मैत्री आजही प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवत आहे. शोले, चुपके चुपके, सीता और गीता, ड्रीम गर्ल, दी बर्निंग ट्रेन, मेरा नाम जोकर,अपने, लाइफ़ इन अ... मेट्रो, ओम शांती ओम, हम कौन हैं?, किस कीस की किस्मत यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांनी महत्त्वाच्या प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. हिंदी चित्रपटसृष्टीतील अ‍ॅक्शन चित्रपटांमधील तडफदार भूमिका साकारल्याने 'अ‍ॅक्शन हीरो' अशी त्यांची ओळख होती. २०१७ मध्ये त्यांना पुण्याच्या यूएसके फाउंडेशनतर्फे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

राजकारणात सहभाग

मोठ्या पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्याने राजकीय आखाड्यात देखील आपले नशीब आजमावले. २००४ साली लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवत ते राजस्थानच्या बिकानेरमधून निवडून आले होते.

logo
marathi.freepressjournal.in